पिंपळगाव सडक येथे २ ते ५ फेब्रुवारीपर्यंत भव्य कृषि विकास परिषद, कृषि प्रदर्शनाचे आयोजन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- कृषि विभाग भंडारा, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), भंडारा, व कृषि संलग्न विभाग यांचे संयुक्त विद्यमाने दि. ०२ ते ०५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत मौजा पिंपळगाव/ सडक, ता. लाखनी, जिल्हा भंडारा येथे भव्य कृषि विकास परिषद, कृषि प्रदर्शन तसेच जिल्हा पशुसंर्वधन विभागामार्फत पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पिंपळगाव सडक येथील शंकरपटाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त सदर कृषि विकास परीषद व कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी पत्रपरिषदेत दिली.

या कृषि प्रदर्शनाचे उद्घाटनरविवार दि. ०२ फेब्रुवारी २०२५ रोजी संजय सावकारे मंत्री वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, भंडारा यांचे शुभहस्ते होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कविता उईके, अध्यक्ष, जि. प. भंडारा भूषवितील. कृषि प्रदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, कृषि व संलग्न व्यवसायाबाबत चर्चासत्र व परीसंवाद, शेतकरी सन्मान समारंभ, महिला बचत गट निर्मित वस्तुंचे प्रदर्शन व विक्री हीप्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. प्रदर्शनात शेती उपयोगी औजारे, सिंचन साधने यांचे स्वतंत्र दालन, कृषि निविष्ठा, सेंद्रिय पध्दतीने उत्पादीत शेतमाल व प्रक्रिया उत्पादने, कलात्मक वस्तु, खाद्य पदार्थ आणि बचत गटांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तु विक्रीसाठी उपलब्ध असतील.

कृषि व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञानावर आधारीत प्रात्यक्षिकेही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी शेतकऱ्यांना प्रदर्शनात लाभेल. यामध्ये बायोडायनामिक पद्धतीने खत निर्मिती, सीपीपी कल्चर निर्मिती, गांडूळ खत निर्मिती, अझोला उत्पादन, १० ड्रम थेअरी, ड्रोन द्वारे फवारणी, भात लागवडीच्या विविध पद्धती, जैविक पद्धतीने किडनियत्रण इ. प्रात्यक्षिकांचा समावेश असणार आहे.

शेतकऱ्यांना नविन तंत्रज्ञानाची माहीती व्हावी यासाठी विविध विषयावरील परीसवाद व चर्चासत्राचे नायोजन करण्यात येणार आहे. शेतीमध्ये नवनविन प्रयोग करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा या प्रदर्शनात सत्कार केला जाणार आहे. याशिवाय शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची माहीती देणारे स्टॉलही प्रदर्शनात लावण्यात येणार. शेतकरी बंधुंसाठी माहीतीपुर्ण असणाऱ्या या कृषि विकास परीषद व कृषि प्रदर्शनास जास्तीत जास्त शेतकरी, ग्राहक तसेच नागरीकांनी भेट द्यावी असे आवाहन डॉ. संजय कोलते, जिल्हाधिकारी, भंडारा यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *