आपला समृद्ध इतिहास मराठी माणसाला माहीत असावा-रेणुकादास उबाळे

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- मराठी भाषेचा इतिहास दोन हजार वर्ष आधीचा आहे. गाथासप्तशतीपासून ते मुकुंदराज, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी महाराज यांचा संपन्न वारसा मराठी भाषेला लाभला आहे. हा समृद्ध इतिहास प्रत्येक मराठी माणसाला माहीत असावा असे प्रतिपादन मराठी भाषेचे अभ्यासक डॉ. रेणुकादास उबाळे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय व नटवरलाल जशभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय मोहाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत “मराठी भाषा रोजगाराच्या संधी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजनकरण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेंद्र पवार हे होते. प्रमुख वक्ते म्हणून मराठी भाषेचे तज्ज्ञ रेणुकादास उबाळे, मुंबई येथील भाषा संचालनालयाचे दत्तात्रय गायकवाड, डॉ. रंजना डाकरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा शाल, ग्रंथ भेट देऊन महाविद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

भाषा संचालनालयाचे दत्तात्रय गायकवाड यांनी शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा पहिला राजव्यवहार कोश तयार केल्याचे सांगून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत ३६ मार्गदर्शक सत्र महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली. डॉ. रेणुकादास उबाळे यांनी “मराठी भाषा : रोजगाराच्या संधी’ या विषयावर बोलताना सांगितले की, आज वृत्तपत्र, विविध वाहिन्या, चित्रपट, नाटकयासह जाहिरात, गीत, संवाद, पटकथा लेखन, मुद्रितशोधन, अनुवाद, भाषांतर, सोशल मीडियावरील लेखन या क्षेत्रात विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. यासाठी मराठी भाषा व साहित्याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. सुरेंद्र पवार यांनी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी ओळखून स्वतःचे भविष्यव्य निश्चित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन नरेश आंबिलकर यांनी केले, आभार डॉ. गणेश वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाला अनमोल गंधे व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *