नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
दै. लोकजन वृत्तसेवा मुंबई/भंडाराः- राज्यातील २४६ नगरपरिषदा (भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली-सेंदुरवाफा पकडून) व ४२ नगरपंचायतींच्या (एकूण २८८) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान; तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार असल्याने या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. येथील सचिवालय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेशकाकाणी यावेळी उपस्थित होते.

श्री. वाघमारे यांनी सांगितले की, या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास १० नोव्हेंबर २०२५ पासून सुरुवात होईल. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर २०२५ असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत; तर अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंतमतदानाची वेळ असेल. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल. राज्यातील एकूण २४७ पैकी २४६ नगरपरिषदांसाठी ही निवडणूक होत आहे.
निवडणूक होत असलेल्यांपैकी १० नवनिर्मित नगरपरिषदा आहेत. उर्वरित सर्व २३६ नगरपरिषदांची मुदत संपली आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे पातूर (जि. अकोला)नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहे. त्याचबरोबर एकूण १४७ पैकी ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक होत असलेल्यांपैकी १५ नवनिर्मित; तर उर्वरित सर्व २७ नगरपंचायतींची मुदत यापूर्वीच संपली आहे. १०५ नगरपंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही. नगरपरिषदेसाठी साधारण सदस्य संख्या ही २० ते ७५ एवढी असते. नगरपंचायतीसाठी सदस्य संख्या १७ आहे. नगरपरिषदेची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीप्रमाणे आहे. आणि नगरपरिषदेत साधारणतः एका प्रभागात दोन जागाअसतात. पण नगरपरिषदेच्या सदस्य संख्येचा आकडा विषम जर असेल तर नगरपरिषदेत एका प्रभागामध्ये तीन जागा असतात. म्हणजे मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी मतदान करावं लागेल. या शिवाय नगरपरिषदेच्या एका अध्यक्षासाठी मतदान करावं लागेल.









