राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे आज “काळी दिवाळी व मौन आंदोलन’
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- राज्यातील शेतकरी अतिवृष्टी, ओला दुष्काळ आणि पिकांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे अडचणीत सापडला आहे. पण या संकट काळात सरकारने जाहीर केलेले मदत पॅकेज हे फसवे, अपुरे आणि दिशाभूल करणारे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तर्फे करण्यात आला आहे. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे वतीने संपूर्ण राज्यात ठरल्याप्रमाणे उद्या दि. १७ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “काळी दिवाळी व मौन आंदोलन’ करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी आज विश्रामगृहात घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले.
माजी आमदार चरण वाघमारे पुढे म्हणाले, निवडणुकीच्या वेळी सरकारने सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र एक वर्ष लोटूनही कर्जमाफी दिली.सरकारने जाहिर केलेले पॅकेज हे एनडीआरएफ निकषात आधीपासून असलेल्या मदतीचे पुनरुच्चार असून नवीन काहीही दिलेले नाही. ६८ लाख हेक्टर नुकसान असूनसुद्धा सरकारने केवळ १३,००० कोटी दिले आहेत, जे अपुरे आहे. हेक्टरी किमान ५०,००० रुपये प्रमाणे ३५,००० कोटी मदत अपेक्षित होती. घर, दुकान व जनावरांसाठी दिलेली मदतही केवळ एनडीआरएफ निकषानुसार आहे.वाढती महागाई लक्षात घेता प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंबाला किमान २.५ लाख रुपये थेट आर्थिक मदत मिळायला हवी. विमा कंपन्या देतात ती मदत, सरकारची नाही.
चुकीच्या ट्रिगरमुळे शेतकऱ्यांचे नुकसान दुप्पट झाले आहे. सरकारने बंद केलेल्या “आनंदाचा शिधा व साडी’, “माझी सुंदर शाळा’, “१ रुपयात पिकविमा’, “योजनादूत योजना, “मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’, लाडका भाऊ योजना’ यांसारख्या जनहिताच्या योजना पुन्हा सुरू कराव्यात. विद्यार्थ्यांना अकॅडेमिक फी माफी द्यावी. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी व ओला दुष्काळ तातडीने जाहीर करावा.
यासाठी महायुती सरकारच्या फसव्या पॅकेजचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देऊन त्यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तर्फे लाक्षणिक मौन आंदोलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती चरण वाघमारे यांनी दिली. पत्रकार परिषदेला जिल्हा सरचिटणीस विनोद वटी, सेवादल जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे,जिल्हा सहसचिव अजय मेश्राम, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष गीतेश ठोंबरे, भंडारा शहर अध्यक्ष मधुकर चौधरी, भंडारा तालुकाध्यक्ष दुलीचंद देशमुख, भंडारा ज्येष्ठ नागरिक तालुका अध्यक्ष मधुकर भोपे युवक जिल्हाध्यक्ष नितेश मारवाडे, समाज कल्याण विभाग जिल्हाध्यक्ष राकेश श्यामकुवर उपस्थित होते.









