शिवसेना युवा लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी यांचा भाजपात प्रवेश; आ. भोंडेकर यांना धक्का

भंडारा नगर परिषदेचे माजी अध्यक्ष भगवान बावनकर ही भाजपात
काशिनाथ ढोमणे
भंडारा :- आ. नरेंद्र भोंडेकर यांचे खंदे समर्थक भंडारा युवा शिवसेना लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी व भंडारा नगर परिषदेचे माजी अध्यक्ष भगवान बावणकर यांनी शुक्रवार दि. १० ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत भाजपाचा दुपट्टा खांद्यावर घेतला. आज भंडारा येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे यांनी त्यांना भाजपात अधिकृत प्रवेश दिला.

जॅकी रावलानी हे आ. नरेंद्र भोंडेकर यांचे उजवे हात समजले जात होते. ते युवा शिवसेना भंडारा लोकसभा प्रमुख होते. विश्व हिंदू परिषदेचे भंडारा जिल्हाध्यक्ष आहेत. आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या निवडणुकीची रणनिती त्यांनीच आखली होती. अशी चर्चा आहे. तेव्हा आ. भोंडेकर यांनी जॅकी रावलानी यांना नगर परिषद अध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते, अशी चर्चा होती. मात्र भंडारा नगराध्यक्ष पद हे महिला खुला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने आता आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी डॉ. अश्विनी भोंडेकर यांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर ही उमेदवारी आपल्या पत्नीला मिळावी अशी मागणी जॅकी रावलानी यांनी केली होती. मात्र आपल्या पत्नीला शिवसेनेची उमेदवारी मिळणे अशक्य आहे असे लक्षात येताच जॅकी रावलानी यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला
जॅकी रावलानी यांच्या नाराजीचा फायदा भाजपच्या एका गटाने घेण्याचे ठरविले. आ. डॉ. परिणय फुके यांनी जॅकी रावलानी यांच्या पत्नीला भाजपची उमेदवारी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रावलानी यांनी काल मुंबई येथे पक्षाच्या कार्यालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आ. परिणय फुके’ यांच्या उपस्थितीत भाजपाचा दुपट्टा खांद्यावर घेतला. त्यांच्या सोबतच भंडारा नगर परिषदेचे माजी अध्यक्ष भगवान बावणकर यांनी सुद्धा भाजपात प्रवेश घेतला. यावेळी ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
आज भंडारा येथे भाजप कार्यालयात जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे यांच्या उपस्थितीत जॅकी रावलानी व भगवान बावनकुर यांना भाजपात अधिकृत प्रवेश देण्यात आला. यावेळी जिल्हा महामंत्री भगवान चांदेवार, मयूर बिसेन, रुबी चढ्ढा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.









