भंडारा-सातोना रस्त्यावरील बंद पथदिवे त्वरीत सुरू करावेत अन्यथा आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- विकासापासून कोसो दूर असलेल्या भंडारा जिल्हयातील जनतेला विकासाचे गाजर दाखविणारे जनप्रतिनिधी मात्र जनतेच्या प्राथमिक गरजा पूर्ण न करू शकणारे शासन, प्रशासन जनतेच्या माथी मारून विकासाच्या मोठमोठ्या थापा मारण्यात व्यस्त असले तरी भंडारा शहरातून जाणाऱ्या रामटेक रोडवरील दुभाजकावर लावलेले स्ट्रीट लाईट मागील तीन महिण्यापासून बंद अवस्थेत आहेत. हे बंद पडलेले स्ट्रीट लाईट त्वरीत सुरू करण्याची मागणी या निवेदनाद्वारे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात येत आहे. भंडारा शहर हे जिल्हयाचे ठिकाण असले तरी सोयी सुविधाच्या दृष्टीने हे जिल्हयाचे ठिकाण कुणालाही वाटणार नाही.

शहरातील असो अथवा शहराकडे येणारे रस्ते हे नावाचेच रस्ते असुन ह्या रस्त्यावर सोयी सुविधांचा प्रचंड अभाव दिसुन येतो. अशाच भंडारा-रामटेक रोडचे चौपदीकरण मागील पाच-सात वर्षापुर्वी झाले. ह्या रस्त्याचे चौपदरीकरण करतांना राष्ट्रीय महामार्ग विभागाने घालूनदिलेल्या नियमांची ऐशी तैशी करण्यात आली.

रस्ता चौपदरीकरण करतांना जी झाडांची कत्तल झाली त्याच्या चार पट झाडे लावून त्यांचे संगोपन करून ती झाडे जगवणे कंत्राटदाराची जवाबदारी असतांना आज त्या झाडांची अवस्था काय आहे, झाडे अस्तित्वात आहेत की नाही याकडे बघण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळच नाही. भंडारा शहरातुन जाणाऱ्या ह्या रस्त्यावर जि.प.चौक ते टवेपार गावापर्यंत दुभाजकावर स्ट्रीट लाईट लावले असले तरी बहुधा हे स्ट्रीट लाईट चालु कमी तर बंद अवस्थेत जास्त असतात. शहरातील केशवनगर ते खुर्शीपार पर्यंतचे जवळपास ३०-३५ स्ट्रिट लाईट मागील तीन महिण्यापासून बंद अवस्थेत असले तरी याकडे कुण्याही जनप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्यांचे लक्ष जावू नये म्हणजे नवलच. परंतु केवळ टक्केवारी मध्ये खुश असलेल्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना जनतेच्या अडचणी दिसणार तरी कशा? या अंधाराच्या साम्राज्याचा फायदा जर असामाजिक तत्वांनी घेवून एखादी वाईट घटना घडली तर त्याला जवाबदार कोण? त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या कर्तव्याची जाणीव ठेवून बंद असलेले स्ट्रीट लाईट त्वरीत सुरू करावेत.

अन्यथा शिवसेना जनतेला होणाऱ्या अडचणीला गांभीर्याने घेवून रस्त्यावर उतरणार असा इशारा या निवेदनाद्वारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे जिल्हा प्रमुख संजयभाऊ रेहपाडे, तालुका प्रमुख तिलक सार्वे, शहर प्रमुख राकेश आग्रे, भोला शेंडे, मयुर जोशी, निलेश चामट, राजेश ठवकर, जितू हटवार, मुकेश तिजारे, विष्णू ठवकर, कुंदन चौधरी, नंदू बावणे, अविनाश मते इ. पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *