गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी भंडाऱ्यात ४ जूनला विभागीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- गोसेखुर्द प्रकल्प बाधितांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांचा थेट आढावा घेण्यासाठी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या पुढाकाराने येत्या ४ जून रोजी दुपारी ३.०० वाजता भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परीषद कक्षात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये पुनर्वसन, नागरी सुविधा, पात्रता, नोंदणी, रोजगार व मच्छीमारी अधिकारांसह विविध मागण्यांवर सखोल चर्चा होणार आहे. संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित राहणार आहेत. ४ जून रोजी होणाऱ्या बैठकीकडे प्रकल्पग्रस्त, सामाजिक संघटना व प्रशासनाचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने दिलेले आश्वासन पाळून तातडीने ठोस निर्णय घेतले जावेत व सर्व विभागांनी समन्वय साधत प्रकल्पग्रस्तांचा न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, २२ एप्रिल २०२५ रोजी अंभोरा येथील पुलावर गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त कृती समितीने खासदार डॉ. पडोळे यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा काढतजोरदार आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने, प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्काच्या दृष्टीने ही निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार डॉ. पडोळे यांनी सांगितले की वर्षानुवर्षे अन्याय सहन करणाऱ्या प्रकल्पबाधितांना न्याय मिळवून देणे हे कर्तव्य आहे. प्रकल्प बाधितांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये संसदेमध्ये यापूर्वीही आवाज उठविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *