ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना ५० हजार प्रती हेक्टर मदत व संपूर्ण कर्जमाफी द्या
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांची शेती, पीक व गुरांसाठीचा चारा पूर्णतः नष्ट झाला आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५०,००० रुपये मदत देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,माहे जुलै महिन्यात अतिवृष्टी व महापुरामुळे शेतीमाल पूर्णतः वाहून गेला आहे. गुरांसाठी चारा शिल्लक राहिला नाही व दुबार पेरणी करण्यात आली परंतु सततच्या येणाऱ्या पावसामुळे पुन्हा शेतजमीन पाण्याखाली आली असल्यामुळे शेतमालाचे फार नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. सरकारने तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीने पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याची म्हणजे संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती; मात्र आजपर्यंत ती अंमलात आलेली नाही. कॉंग्रेस पक्षाने यावर सरकारविरोधात कठोर भूमिका घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरअन्याय होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. यावेळी मोहन पंचभाई अध्यक्ष भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी, प्रदेश महासचिव जिया पटेल, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, माजी आमदार अनिल बावनकर, शहर अध्यक्ष धनराज साठवणे, धनंजय तिरपुडे, शमिम शेख, नरेंद्र साकुरे, किशोर राऊत, प्यारेलाल वाघमारे, राजेश हटवार, स्नेहा भोवते, मंजुषा चव्हाण, स्मिता मरघडे, पृथ्वी तांडेकर, नरेश कावळे, आवेश पटेल, हिरामन तांडेकर, आकाश ठवकर, लखन चवरे, कमल साठवणे, सुरेश काटेखाये, वैशाली वालदे, रणजित सेलोकर, स्वाती हेडाऊ, गजानन झंझाळ, जीवन कावळे, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.







