खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी ३.५० लाख; अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३१ हजार ६२८ कोटीचं पॅकेज जाहीर
मुंबई:- राज्यातील अतिवृ्ष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा लागली असून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे आजच शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा होणार असल्याची माहिती होती, दिवाळीपूर्वीच बळीराजाच्या खात्यावर मदतनिधी जमा होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितले होते. दिवाळी सणाला अवघे काही दिवस राहिल्याने आता राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी अखेर मदतीचं पॅकेज जाहीर केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी मदत पॅकेजची घोषणा केली. त्यानुसार, ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेली, त्यांना हेक्टरी ३.४७ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच, अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी पाहणी दौरा केला, तेव्हापासून मदतीच्या पॅकेजची लवकरच घोषणा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यातच, राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हीच मागणी केली असून महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आजमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकजेची घोषणा केली असून सर्वांनाच मदत होईल, असे प्रयत्न सरकारचे या पॅकेजमध्ये दिसून आले आहेत. शेतकरी, नुकसानग्रस्त घरे, जमिनी आणि जनावरांच्या नुकसानीसाठीही भरीव मदत देण्याचा शासनाचा निर्णय आहे. शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेलं हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज आहे.
शेतकरी रब्बीचे पिक घेतोय की नाही हे विचारत न घेता आम्ही १० हजार रुपयांची मदत करत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज सकाळीच फोन केला. विम्या संदर्भात बैठक घेत तातडीनं योग्य मदत दिली पाहिजे यासाठी सरकार दबाव आणेल, व्हॅलिडेशनसाठीही आता आपण प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांना मदत करायची आहे तर ताण सहन करावा लागेल, इतकी अतिवृष्टी होईल याची कल्पना नव्हती. काही बाबींवर ताण सहन करावा लागेल, आत्ताच सांगता येत नाही. पण, शेतकऱ्यांना तात्काळ पैसे देणं सुरु करतोय, कुठे कमी करायचं आणि वाढवायचं हे डिसेंबच्या अधिवेशनात बघू, असेही फडणवीसांनी म्हटलं.







