जिल्ह्यातील ९६ गावातील शेतकऱ्यांना मिळणार सौर कुंपन
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा वनविभागातील मानव व वन्यजीव संषर्ष तसेच वन्यप्राण्यांकडून शेत पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत होते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना अंमलात आणली आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील ९६ गावातील ०२ हजार ८६४ शेतक-यांना अनुदानातून सौर कुंपन दिल्या जाणार आहे. लाभार्थ्यांच्या यादीला वनविभागाने मंजूरी दिली आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली. जिल्हातील मोठा भूभाग जंगल व्याप्त आहे. अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन जंगल परिसराला लागून असल्याने नेहमी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतक-यांन गंभीर स्वरूपाची इजा व दुखापत होते अथवा जीव गमवावा लागतो. दरवर्षी अशा घटनांमध्ये वाढ होत आहे.
तसेच जंगल लगतच्या परिसरात व अन्य भागात देखील वन्यप्राण्यांचा हैदोस वाढल्याने शेत पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतक-यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होते. जंगली डुकर, रोही-निलगाय, हरिण व अन्य जंगली प्राण्यांमुळे दरवर्षी होणा-या नुकसानाची आकडेवारी वाढत असल्याने शेतक-यांच्या पिकांचे सरंक्षण व्हावे यासाठी, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व वन मंत्रीश्री. गणेश नाईक यांच्या पुढाकारातून राज्य शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना अंमलात आणून योजनेतंर्गत शेतक-यांना सौर कुंपन देण्याचा निर्णय दिनांक१६ सप्टेंबर २०२३ रोजी घेतला होता.
शेत पिकांचे संरक्षण व मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी शेतकऱ्यांना सौर उर्जेचे कुंपन अनुदानावर दिल्या जाणार आहे. मागील तीन वर्षात ज्या गांवामध्ये वन्यप्राण्यांचा हैदोस होता त्या गावांची निवड या योजनेतंर्गत करण्यात आली आहे. शेतकयांना सौर कुंपन करण्यासाठी ७५ टक्के अनुदान राज्य सरकार देणार आहे. उर्वरीत २५ टक्के रक्कम शेतकऱ्याना दयावी लागणार आहे. सदर योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर केले होते. त्या अर्जांची छानणी करून मंजूर देण्यात आली आहे. जिल्ह्यात भंडारा, पवनी, अडयाळ, साकोली, लाखनी, लाखांदुर, लेडेंझरी,जांबकांद्री, नाकाडोंगरी, तुमसर आदी वनपरिक्षेत्र आहे. या क्षेत्रातंर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.







