बपेरा-तुमसर-भंडारा राष्ट्रीय महामार्गाची त्वरित दुरुस्ती करा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा : – बपेरा-सिहोरा- तुमसर-मोहाडी-वरठी-भंडारा राष्ट्रीय महामार्ग क्रं.५४३ के. त्वरित दुरुस्ती न केल्यास दिनांक ०५ सप्टेंबर २०२५ ला नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती तुमसरमोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सविस्तर असे की, राष्ट्रीय महामार्ग बालाघाट ते भंडारा ५४३ के. मंजूर झालेला आहे. सदर रस्त्यावर बपेरा -सिहोरा- तुमसर-मोहाडी-वरठी-भंडारा मार्ग येतो, या रस्त्यावरुन खुप मोठ्या प्रमाणात वाहनांची दळण-वळण होत आहे. सदर रस्त्याला मध्यप्रदेश राज्याची सीमा लागू असल्यामूळे फार मोठ्या प्रमाणात आंतरराज्य वाहतुक होत असते.
सदर रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले असुन मोठ्या प्रमाणात अपघात होवून नागरिकांना अपंगत्व आलेले आहे व काहींना तर जिव गमवावे लागले आहे, याची आपल्या विभागाने काळजी घेतली नाही. संदर्भिय पत्रानुसार मी स्वतः प्रत्यक्ष रित्या आपल्याला भेट दिली व या विषयावर वारंवार फोन तसेच व्हॉट्ॲप द्वारे सुध्दा विचारपुस केली परंतु आपण नेहमी उळवा-उळिवची उत्तरे दिली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही.
यामूळे लोकप्रतिनिधी व शासन यांच्यावरही जनेतेतून प्रचंड नाराजगी व्यक्त होत आहे, नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला असून सदर रस्त्याच्या दुरव्यवस्थेमुळे जनतेचा संय्यम सुटत चाललेला आहे, सबंधित विभागाचे अभियंता व कंत्राटदार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. नागरिकांच्या उज्वल भविष्याचा विचार करुन सदर रस्ता लवकरात- लवकर दुरुस्त करण्यासाठी संबंधित विभागाला आदेशित करावे. अन्यथा नागरिकांच्या वतीने दिनांक ०५ सप्टेंबरला तीव्र आंदोलन करण्यात येईल, त्यात काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहिल, असा इशारा आमदार राजू कारेमोरे यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या पत्रातून दिला आहे.







