पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत १७ पैकी १२ पोलीस स्टेशनला आयएसओ प्रमाणपत्र प्रदान
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा : – पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत भंडारा पोलीस दलाच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचा सखोल आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केलेल्या विविध कामांची माहिती सादर करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांवर केलेली कारवाई, १०० हून अधिक गुन्हेगारांना तडीपार करण्यात येणार आहे आणि ‘जागर नशामुक्ती’ अभियानांतर्गत केलेल्या कामांचा समावेश आहे. नागरिकांच्या तक्रारी सोप्या पद्धतीने हाताळण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सेवा पोर्टल’, ‘ई-दरबार’ आणि ‘ई-समाधान’ या ऑनलाइन सुविधांवर चर्चा झाली. तसेच, ४० वर्षांवरील अंमलदारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी ‘आरोग्यम ॲप’, ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी ‘सायबर बोट’ आणि ‘प्रकल्प दिशा’ यांसारख्या उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भंडारा जिल्ह्यातील १७ पैकी १२ पोलीस आस्थापनांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यामध्ये पोलीस स्टेशन भंडारा, लाखांदुर, मोहाडी, तुमसर, दिघोरी, करडी, साकोली, कारधा, सिहोरा, जवाहरनगर, अड्याळ आणि मोटार परिवहन विभाग यांचा समावेश आहे. या सर्व पोलीस स्टेशनचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याव्यतिरिक्त, बैठकीत ४० चारचाकी आणि ६७ दुचाकी वाहनांवर जीपीएस ऑन’ करणे, ‘सायबर जनजागृती पुस्तिका’ प्रकाशन, ‘भंडारा पोलीसः कर्तव्य व सेवा मासिक, ‘दामिनी निर्भया पथकाची कामगिरी’ आणि ‘पोलीस सबसिडीअरी कॅन्टीन’ यांसारख्या महत्त्वपूर्ण कामांचीही माहिती देण्यात आली. या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधीकारी तुमसर मयंक माधव, उपविभागीय पोलीस अधीकारी भंडारा प्रशांत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधीकारी साकोली आनंद चव्हान, उपविभागीय पोलीस अधीकारी पवनी मनोज सिडाम यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.







