तुमसर नगरपरिषदेसमोर आज जनसुनावणी आंदोलन
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- नगरपरिषद च्या ४ वर्षापासून निवडणुका न घेतल्याने, या काळात शासनाचे माध्यमातून प्रशासक नगरपरिषदेचे निर्णय घेत असल्याने तुमसर शहरातील नागरिकांच्या ज्वलंत समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून नगरपरिषद प्रशासनाकडून सातत्याने होत असलेले दुर्लक्ष लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तुमसर शहराच्या वतीने भव्य जनसुनावणी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी बुधवारी सकाळी ११ वाजता नगरपरिषद, तुमसर येथे पार पडणार आहे.
जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण भाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेऊन संबंधित प्रशासनाला निवेदन दिले जाणार आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई, रस्त्यांची दुरवस्था, वीजपुरवठा अडचणी, गटार व सांडपाणी समस्या, पावसाळ्यातील डेंग्यूचिकनगुनियाचा प्रादुर्भाव, कचरा व्यवस्थापनातील अकार्यक्षमता अशा अनेक मूलभूत प्रश्नांवर तोडगा निघण्यासाठी हे आंदोलन होणार आहे. नागरिकांच्या हक्कासाठी व शहराच्या विकासासाठी मोठ्या संख्येने तुमसर शहरातील नागरिकांनी उपस्थित राहून आवाज उठवावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण भाऊ वाघमारे यांनी केले आहे.







