पलाडी फाटा येथेच अंडरपास हवा! ८०० मीटर पुढे नको

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- पलाडी फाटा येथे प्रस्तावित अंडरपासच्या प्रश्नावरून परिसरातील १० गावांतील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. NHAI च्या अधिकाऱ्यांनी पलाडी फाट्यापासून जवळपास ८०० मीटर पुढे सर्वेक्षण करून डीमार्केशन केले असून या ठिकाणाला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. अंडरपास अन्य ठिकाणी न करता पलाडी फाटा येथेच बांधण्यात यावा, अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे.

या महत्त्वपूर्ण प्रश्नावर माजी खासदार सुनील मेंढे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे जिल्हाध्यक्ष असित बागडे आणि इंडियन प्रफुल्ल यांनी संपूर्ण गावाची भौगोलिक परिस्थिती, १० गावांतील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी आणि पलाडी फाटा येथेच अंडरपास असण्याची तांत्रिक गरज माजी खासदारांसमोर मांडली. गावकऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत आवश्यकतेनुसार १५० ते २०० मीटरपर्यंत समायोजन करण्याची तयारी दर्शविली आहे.

मात्र अंडरपासचे ठिकाण पलाडी फाटाच असावे, यावर नागरिक ठाम आहेत. येथे छोटा बॉक्स अंडरपास किंवा तांत्रिकदृष्ट्या योग्य असलेला मोठा अंडरपास बांधावा, अशी प्रमुख मागणी आहे. नागरिकांनी आपल्या समस्या मांडताच माजी खासदार सुनील मेंढे यांनी जागेवरूनच NHAI च्या संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून प्रश्नाचे गांभीर्य व नागरिकांची मागणी निदर्शनास आणून दिली.

यावेळी कैलास चामलाटे, पुरुषोत्तम चामलाटे, रवींद्र गजभिये, अमित नेवारे, नितेश उईके, अक्षय चामलाटे, अरुण मंडारे, योगेश चामलाटे, संदीप चामलाटे, महेश चामलाटे, प्रज्वल सोनवणे, प्रणय चामलाटे, शेखर कांगले, शेखर मानकर, संदीप नेवारे, विशांत श्यामकुंवर, शिवशंकर चामलाटे, सुनील चामलाटे, ओमप्रकाश कांगले, सुखदेव दूधकवरे, रवींद्र चामलाटे, चनेश्वर चामलाटे, अमन चामलाटे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *