रामटेक, नगरधन आणि अंबागढला राष्ट्रीय वारसा घोषित करा – मयूर बिसेन
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- अखिल भारतीय क्षत्रिय पोवार महासंघाच्या राष्ट्रीय व प्रादेशिक कार्यकारिणीच्या शिष्टमंडळाने उत्तराखंडचे महामहिम राज्यपाल आदरणीय डॉ. कृष्णसिंह बिसेन जी यांची शिष्टाचार भेट घेऊन छत्तीस कुल क्षत्रिय पोवार समाजाच्या ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारशाचे संरक्षण, संवर्धन आणि विकास यासंबंधी सविस्तर निवेदन सादर केले. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मयूर बिसेन यांच्या नेतृत्वाखाली सोपवण्यात आलेल्या या निवेदनात समाजाच्या प्राचीन वारशाशी निगडित अंबागढ, नगरधन व रामटेक यांना तीर्थस्थळ व ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून विशेष मान्यता देण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले की, अंबागढ हे पोवार क्षत्रिय राजवंशाची प्राचीन राजधानी व गौरवाचे प्रतीक राहिले आहे. नगरधन (नंदिवर्धन) ही प्राचीन नगरी असून पुरातत्वीय व सांस्कृतिक महत्त्वाचे केंद्र आहे. तर रामटेक हे धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक श्रद्धेचे महत्त्वाचे स्थळ आहे. ही तिन्ही स्थळे केवळ पोवार समाजाचाच वारसा नसून भारतीय इतिहास, संस्कृती व सनातन परंपरेची अमूल्य धरोहर आहेत. महासंघाने या ऐतिहासिक स्थळांच्या सध्याच्या संरक्षण व विकासाच्या गरजेवर लक्ष वेधत त्यांचा योग्य प्रचार-प्रसार आणि ऐतिहासिक महत्त्व राष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित करण्याची मागणी केली.
महासंघाने सादर केलेल्या निवेदनात प्रामुख्याने या तिन्ही स्थळांना तीर्थस्थळ व वारसा स्थळ म्हणून विशेष मान्यता देण्यासाठी संबंधित राज्य सरकारांना शिफारस करणे, त्यांच्या विकास, जीर्णोद्धार व पर्यटन सुविधांच्या विस्तारासाठी विशेष आर्थिक निधी किंवा पॅकेज मंजूर करणे तसेच संग्रहालय व संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर या स्थळांच्या गौरवशाली इतिहासाचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करणे, पर्यटन विभागाच्या यादीत व सांस्कृतिक दिनदर्शिकेत स्थान देणे तसेच दरवर्षी सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन करण्याची विनंती करण्यात आली. महासंघाने केंद्र व संबंधित राज्य सरकारांच्या पर्यटन, संस्कृती व पुरातत्त्व विभागांच्या माध्यमातून संयुक्त कार्ययोजना तयार करून या स्थळांचे संरक्षण व सर्वांगीण विकास या दिशेने ठोस पुढाकार घेण्याची मागणीही केली.
ऐतिहासिक वारशाचे संरक्षण हा केवळ एका समाजाचा विषय नसून भारतीय सभ्यता, संस्कृती व ऐतिहासिक धरोहर यांना येणाऱ्या पिढ्यांपर्यंत सुरक्षित पोहोचवणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. या स्थळांचा सुनियोजित विकास झाल्यास ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल तसेच स्थानिक पातळीवर आर्थिक घडामोडी व रोजगाराच्या संधींचाही विस्तार होईल.
या प्रसंगी शिष्टमंडळात प्राचार्य खुशाल कटरे (राष्ट्रीय महासचिव), ॲडव्होकेट जय ठाकूर – सर्वोच्च न्यायालय (राष्ट्रीय उपाध्यक्ष), विश्वनाथ पटले (जिल्हाध्यक्ष, महासंघ गोंदिया), धनिषा संजय कटरे (महिला जिल्हाध्यक्ष, गोंदिया), उर्मिला रहांगडाले (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य), हिमांशु पटले (तालुका युवा अध्यक्ष, तिरोडा), राम शिवराम बिसेन (तालुका अध्यक्ष, तुमसर), जयंत जयराम बिसेन (सदस्य, महासंघ, भंडारा) व प्राचार्य आर. आय. रहांगडाले (सदस्य, महासंघ) उपस्थित होते.
शिष्टमंडळाने महामहिम राज्यपाल महोदयांना या महत्त्वाच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक मागणीवर सहानुभूतिपूर्वक विचार करून संबंधित राज्य सरकारे व विभागांना योग्य शिफारस व आवश्यक कार्यवाहीसाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. महासंघाने विश्वास व्यक्त केला की, या प्रयत्नांमुळे छत्तीस कुल पोवार समाजाची ऐतिहासिक ओळख, गौरवशाली वारसा व सांस्कृतिक परंपरांच्या संरक्षण आणि संवर्धनाला नवी दिशा मिळेल.









