जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव सुरू
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथील जलतरण तलाव दि. ४ एप्रिल २०२५ पासून खेळाडू आणि हौशी जलतरणपटूंसाठी खुला करण्यात आला आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील जलतरण प्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. या शुभारंभ प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, अक्वॉटिक असोसिएशन भंडाराचे अध्यक्ष अभय भागवत, सुभाष जमजारे, स्वप्नील करकाडे, मिलिंद भेंडारकर तसेच अनेक हौशी जलतरणपटू उपस्थित होते.
या वेळी बोलताना लतिका लेकुरवाळे यांनी भंडारा जिल्ह्यातील जलतरण खेळाला चालना देण्यासाठी जलतरण तलावाचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितले. तसेच, जिल्ह्यातील खेळाडूंनी व जलतरण रसिकांनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अभय भागवत यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत जलतरण क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. जलतरण क्षेत्रात भंडारा जिल्ह्याचा ठसा उमटवण्यासाठी हा तलाव एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.