सिहोरा येथील दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :-सिहोरा पोलिसांना आव्हान ठरलेल्या चोरी प्रकरणातील सिहोरा येथील दोन चोरटे अखेर सिहोरा पोलिसांच्या जाळ्यात अडकले. आरोपी अनिल उर्फ गणेश उर्फ किटाणू चुनीलाल इळपाचे (वय ३२ वर्षे) रा. सिहोरा व अजय उर्फ मामा प्रल्हाद घोडीचोर (वय ४२ वर्षे) रा. सिहोरा यांना २२ मे रोजी ताब्यात घेऊन अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विदर्भात प्रथम क्रमांकावर असलेली दि सहकारी राईस मिल सिहोरा येथे चोरी झाल्याची तक्रार १९ एप्रिल रोजी दि सहकारी राईसमिल सिहोराचे व्यवस्थापक तीलकचंद हरिचंद बिसने यांनी पोलीस स्टेशन सिहोरा येथे दिली होती.यात ५२ हजार रुपयाची मालमत्ता मागच्या दरवाजातून चोरी गेल्याचे नमूद करण्यात आले होते.या प्रकरणात पोलीस स्टेशन सिहोराचे ठाणेदार विजय कसोधन यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींनी चोरी प्रकरणात गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांचे कडून २० हजार रुपये किमतीची मालमत्ताताब्यात घेण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध अ. क्र.९१/ २०२५ कलम ३३१(३) ३३१ (४) ३०५ (ए) अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे. पुन्हा ३२ हजाराचा मुद्देमाल आरोपींनी कुठे ठेवला त्याचा तपास सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोपने यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांनी केली. या प्रकरणात शिपाई मनोज इर्ळपाचे, तिलकचंद चौधरी, गजानन तिरकाडे, वीरकुमार राऊत, मनोज कहनावत व निलेश गजाम यांनी अथक परिश्रम घेतले.