निलागोंदीत आढळला दुमिर्ळ प्रजातीचा खवले मांजर

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी:- लाखनी वन परिक्षेत्रातील सहवन क्षेत्र जांभळी येथील बिट निलागोंदी येथे (ता.३० मे) रोज शुक्रवारला सकाळी ११वाजताच्या सुमारास राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सुरू असलेल्या नहराच्या कामावर झाडे झुडपे साफसफाई करीत असताना वन्यजीवाची ओळख असणाऱ्या रामकृष्ण मेश्राम रोहयो या मजुराला रेड लिस्ट मध्ये असलेल्या फॉलिडोटा वर्गातल्या मॅनिडी कुळातील मॅनिस प्रजातीतील सस्तन प्राणी दुमिर्ळ खवले मांजर हा वन्यप्राणी रामकृष्ण मेश्राम यांना आढळून आला. ही माहिती रामकृष्ण मेश्राम यांनी निलागोंदी येथील रोजगार सहाय्यक खुशाल भुरे यांना दिली असल्याने त्यांनी सदर वन्यजीव रेड लिस्ट असल्याचे कळताच दूरध्वनी द्वारे क्षेत्र सहाय्यक एस. बी.उईके जाभळी,क्षेत्र सहाय्यक जितेंद्र बघेले लाखनी, वनरक्षक रुपाली राऊत निलागोंदी तसेच वन विभागास देण्यात आली. वन विभागास माहिती मिळताच सहाय्यक उपवन अधिकारी संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या बचाव पथक घटना स्थळी दाखल झाले. सदर खवले मांजर याला ३०० मजुरांच्या उपस्थितीत खवले मांजर या वन्यप्राण्यास बिळातून काढुन ताब्यात घेतले.

यावेळी क्षेत्र सहाय्यक एस. बी. उईके जाभळी, वनरक्षक रुपाली राऊत निलागोंदी, वनरक्षक आर. सी. भराडे, वनरक्षक बी. बी. निश्चित जांभळी तसेच वनमजुर उपस्थित होते. अनिरुद्ध पडोळे, गंभीरा वंजारी, गोवर्धन कळपते, मनोहर शेंडे, ताजमुल वंजारी, चेतन वंजारी यांनी खवले मांजर काढण्यास मदत केली. त्याची वैद्यकीय तपासणी केली व नजीकच्या वनक्षेत्रात निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. आशिया व आफ्रिका खंडात हे खवले मांजर सापडते. हे प्राणी शक्यतो पोकळ झाडे किंवा बिळामध्ये राहतात. खवले मांजर निशाचर असून त्यांचा आहार प्रामुख्याने मुंग्या आणि वाळवी हा आहे. सहसा हा प्राणी एकटा राहतो. केवळ प्रजननासाठी नर मादी भेटतात. खवले मांजराची मांसासाठी शिकार केली जाते. सुरक्षीत वन क्षेत्र कमी झाल्याने ते मानवी वस्तीत धाव घेत आहे. सदर खवले मांजराच्या एकूण ८ प्रजाती अस्तित्वात असून सर्व प्रजातींची त्याच्या खवल्यासाठी शिकार केली जात असल्याने इंटरनॅशलन युनिअन फॉर कंझरवेशन ऑफ नेचरने खवले मांजराच्या सर्व प्रजातींना रेड लिस्ट मध्ये समाविष्ट करून क्रीटीकली एनडेजेर्ड घोषित केले आहे. खवले मांजराच्या खवल्यांना चायनीज औषधशास्त्रामध्ये खुप मागणी असल्याने त्याची शिकार करण्याची शक्यता असते. सदर वन्यप्राणी मुंग्या, उधळी खाऊन जगतो. खवले मांजर हा वन्यप्राणी अतिशय दुमिर्ळ असल्याने त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याची शिकार व विक्री भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा असून त्यात कठोर शिक्षेचे प्रावधान आहे. त्यामुळे खवले मांजर सदृष्य कुठल्याही वन्यप्राण्यास ईजा न करता वन विभागाला सुचित करावे असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *