वाहन चालकचं पुरवायचा चोरांना माहिती

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- एका खाजगी चारचाकी वाहनावर चालक म्हणून तो काम करत होता. भाड्याने गाडी करणाऱ्या ग्राहकांना किंवा प्रवासासाठी गाडी ठरविलेल्या घरमालकांना तो नियोजित स्थळी पोहचवून द्यायचा. त्यामुळे कोणते घर किती वेळासाठी कुलूप बंद राहणार हे त्याला चांगले ठाऊक होते. याचा फायदा घेत तो कुलुपबंद घरांची माहिती तो कुख्यात गुंड किंवा चोरांना पुरवायचा. त्यानुसार चोरीची योजना पध्दतशीरपणे आखली जायची आणि शिताफीने चोरी केली जायची. ही एखाद्या सिनेमाची पटकथा नाही तर तुमसर पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या आरोपी रामकिसन तिवाडेचे कारनामेआहेत. पोलीस तपासा दरम्यान रामकिसन हाच त्या दरोडेखोराचा खबरी असून कुलूपबंद घरांची माहिती तो कुख्यात गुन्हेगार धनेंद्र पुंडेला देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा धनेद्र परराज्यात एका दरोड्यात सहभागी होता. काही दिवसांपूर्वी तुमसर तालुक्यात सातत्याने चोरीच्या घटना घडत होत्या.

या सराईत चोरांचा छडा लावण्यात पोलिसांची दमछाक झाली. मात्र खापा येथे सोमवारी रात्री तुमसर पोलिसांनी मोठी कारवाई करत कुख्यात आरोपी धनेंद्र उर्फ शैलेश बळीराम पुंडे (३९) रा. बाम्हणी-आमगाव, जि. गोंदिया याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर अनेक गंभीर बाबी पुढे आल्या. धनेंद्रचा साथीदार रामकिशन बारकु तिवाडे (४२) रा. खैरलांजी, ह. मु. मालवीय नगर, तुमसर हा पसार झाला होता. अखेर बुधवारी पोलीसांनी त्यालाही बेड्या ठोकल्या. खापा येथील रहिवाशी हलमारे कुटुंब २४ मार्च रोजी लग्नासाठी रामटेक येथे गेले होते. त्यांच्या बंद घरावर नजर ठेवून आरोपींनी चोरीचा प्रयत्न केला.

मात्र, योगायोगाने चोरीच्या वेळी कुटुंबीय परतले आणि आरोपी धनेंद्र त्यांच्या तावडीत सापडला. दुसरा आरोपी रामकिशन मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला होता. पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेतला. विशेष म्हणजे आरोपी धनेंद्र २०२३-२४ साली छत्तीसगडमध्ये पडलेल्या ८० ते ९० लाखांच्या दरोड्यात सहभागी होता. त्यासाठी त्याने वर्षभर कारावास भोगला होता आणि नुकताच सुटून आला होता. या दोन्ही आरोपींना सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून तुमसर पोलीस यातून आणखी काही धागेदोरे मिळतात का या दृष्टीने तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *