दुर्मिळ युरेशियन पाणमांजराची कोका वनपरिक्षेत्रात पहिली नोंद

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- युरेशियन पाणमांजर या दुर्मिळ असणाऱ्या प्राण्याची कोका वन परिक्षेत्रात पहिली छायाचित्रणात्मक नोंद झाली आहे. विशेष म्हणजे सध्याच्या गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात १९७८ मध्ये या प्रजातीची शेवटची नोंद केली होती. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे सुमारे १,८९४.९० किमी. इतक्या विस्तृत क्षेत्रावर पसरलेले असून त्याचा विस्तार गोंदिया व भंडारा जिल्ह्यात आहे. सध्या व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वार्षिक व्याघ्र गणना सुरु आहे. त्यासाठी प्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आला आहे. या ट्रॅप कॅमेरात युरेशियन पाणमांजर या दुर्मिळ असणाऱ्या प्राण्याची कोका वन परिक्षेत्रात पहिली छायाचित्रणात्मक नोंद झाली आहे.

चॅम्पियन आणि सेठ यांच्या भारतीय जंगलांच्या वर्गीकरणानुसार हे क्षेत्र उष्णकटिबंधीय शुल्क पानझडी वन या वर्गात येते.व्याघ्र गणनेच्या फेज चार सर्वेक्षण आणि विश्लेषण नवेगाव नागझिरा व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत वन्यजीव जीवशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत अंकित ठाकूर यांनी क्षेत्र संचालक जयरामेगौडा आर. व उपसंचालक पवन जेफ यांच्या मार्गदर्शनाखाली केले. हा शोध नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अतिशय संपन्न अशी जैव विविधता दाखवून देत असून यामुळे व्याघ्र प्रकल्प प्रशासन आणि निसर्गप्रेमींसाठी उत्साहवर्धक बाब आहे. तथापि, हे प्रजातींचेवितरण, अधिवास प्राधान्ये आणि संवर्धन आव्हाने समजून घेण्यासाठी लक्ष्यित आणि सखोल संशोधनाची तातडीची गरज देखील आहे. युरेशियन पाणमांजर आणि त्याच्या अधिवासाचे संरक्षण सुनिश्चित करणे हे व्याघ्र प्रकल्पाचे सर्वोच्च प्राधान्य राहील असे नवेगावनागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोलीचे उपसंचालक पवन जेफ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *