आज भंडारा शहरात विश्व हिंदू परिषदेच्यावतीने ५१ फुट धर्मध्वजारोहण
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- हिंदु नववर्ष गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा, युगान्द ५१२७ निमित्त उद्या दि. ३० मार्च रोजी विश्व हिंदु परिषद परिवार भंडारा जिल्हा तर्फे खामतलाव परिसर भंडारा येथे ५१ फुट धर्मध्वजेचे रोहण व शहरातील प्रमुख चौकांमध्ये गुढी रोहण पुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी ७ वाजता श्री बहिरंगेश्वर मंदिर परिसर भंडारा येथे धर्मध्वज रोहण करण्यात येणार आहे. सकाळी ७.३० ते ९ वाजतापर्यंत खामतलाव चौक ते नगरातील प्रमुख मार्गाने बाईक रॅली काढून गांधी चौक, वि. हिं. प. जिल्हा कार्यालय, शास्त्री चौक, राजीव गांधी चौक, किसान चौक, श्रीराम मंदिर मेन रोड भंडारा येथे गुढीरोहण व पुजन करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता गांधी चौक भंडारा येथे भृशुंड ढोल ताशा पथक वादन व “मराठी पाऊल पडते पुढे’ ही सांस्कृतिक नाट्य सादर करण्यात येणार आहे.
यावेळी पूर्व विदर्भ प्रांत सत्संग प्रमुख सुरेशपंत देशपांडे, विहिंपचे भंडाा जिल्हाध्यक्ष जॅकी रावलानी, श्रीराम शोभायात्रा समिती भंडाराचे अध्यक्ष मयुर बिसेन, मातृशक्ती प्रांत संयोजिका सौ. कांचन ठाकरे, विभाग संयोजिका श्रीमती दिपा नायर, बालसंस्कार प्रमुख सौ. अनुराधा माने, भंडारा नगर संघचालक पंकज हाडगे, भंडारा नगर अध्यक्ष मनोहर हेडाऊ, नगर उपाध्यक्ष कृष्णा हत्तीमारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती विहिंपचे जिल्हा मंत्री डॉ. राकेश सेलोकर, सहमंत्री प्रकाश पांडे, जिल्हा मंत्री नितीन निर्वाण व भंडारा नगर मंत्री राकेश सेलोकर यांनी केली आहे.