शिक्षिका ज्योती नागलवाडे यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- तुमसर येथे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ज्योती नागलवाडे यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उत्कृष्ट अधिकारी – कर्मचारी या श्रेणीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून त्यांना ३०,००० रोख बक्षीस मिळाले.
तुमसर येथील जिजामाता ही खाजगी, नगर परिषद, आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या जाळ्यातील एकमेव जिल्हा परिषदेची शाळा अनेकविध कारणांनी बंद होण्याच्या मार्गावर आलेली असतांना त्या शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका ज्योती नागलवाडे व प्रीती आत्राम यांनी अथक प्रयत्न व उपक्रमांनी शाळेला नवजीवन दिले. यांनी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी नवे उपक्रम राबवले. त्यांनी पालकांचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून तसेच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षणात सुधारणा घडवली.
विशेषतः छोटे व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांच्या लेखन वाचन क्षमतेत वाढ करण्यावर त्यांनी भर दिला. या आणि अशा अनेक अभिनव प्रयोगामुळे विद्यार्थी पटसंख्याच नव्हे तर विद्यार्थी गुणवत्ता सुद्धा वाढली. शाळा नावारूपास आली. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.