वन्यजीव शिकार प्रकरणी दोन आरोपी घटनास्थळावरून फरार

भरमार बंदूक, दुचाकी जप्त; भंडारा वनविभाग लाखांदूर वनक्षेत्र, साकोली उपविभागाची कारवाई

दौ. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- भंडारा वनविभागाच्या लाखांदूर वनक्षेत्र, साकोली उपविभागात अवैध वन्यप्राणी शिकार करणाऱ्यांवर वनविभागाने धाड टाकली आहे. या कारवाईत दोन आरोपी वनाधिकाऱ्यांना पाहून घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले असून त्यांच्याकडून शिकार साहित्य आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

फरार आरोपींत अमितसिंग कांचनसिंग रामगडे (रा. जिरोबा, ता. लाखांदूर) व युसुफ पुकराज जांभूळकर (रा. वार्ड क्रमांक ०५ लाखांदूर) यांचा समावेश आहे.

भंडारा वनविभागाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री अंदाजे ९.४० वाजताच्या सुमारास मौजा सावरगाव येथील गट क्र. ७९ मध्ये (साकोली उपविभाग, लाखांदूर वनक्षेत्र, भंडारा वनविभाग) काही इसमांकडून वन्यप्राण्यांची अवैध शिकार होत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला प्राप्त झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी लाखांदूर प्रदीप बी. चन्ने यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या पथकाने सापळा रचून घटनास्थळी धाड टाकली असता, आरोपींनी वनाधिकाऱ्यांना पाहून घटनास्थळावरून पळ काढला. मात्र यावेळी आरोपीजवळून भरमार बंदूक (देशी बनावटीची) – ०१, नगहेड टॉर्च – ०२ नग, बारूद – अंदाजे १०० ग्रॅम, छरे – १३ नग, दुचाकी क्र. एमएच ३६ एटी ४८४१ जप्त करण्यात आले आहेत.

घटनास्थळाचे स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत मौका पंचनामा व जखीनामा नोंदविण्यात आला आहे. सदर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास उपवनसंरक्षक भंडारा योगेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली साकोलीचे सहायक वनसंरक्षक (रोहयो, संरक्षक व अतिक्रमण निर्मूलन) संजय मेंढे, व लाखांदूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने हे करीत आहेत.

सदर कार्यवाही टी. एस. डावकोरे, बिट रक्षक तिरखुरी, सी. जी. जारवाल, बिट रक्षक देहगाव व इतर वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *