ग्रामपंचायत अधिकारी कै. पी. एन. पाटील यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ मूक मोर्चा
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- जळगाव जिल्ह्यात ग्रामसभेदरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ग्रामपंचायत अधिकारी कै. पी. एन. पाटील यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज १ सप्टेंबर रोजी राज्यभर पुकारण्यात आलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने भंडारा येथे भव्य मूक मोर्चा काढण्यात आला.
भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी, जिल्हा परिषद कर्मचारी तसेच विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने या मूक मोर्यात सहभागी झाले. जिल्हा परिषद, भंडारा येथून मोर्चाला सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे मोर्चाची सांगता झाली.
या मूक मोर्चाचे नेतृत्व दिगंबर गभणे, विलास खोब्रागडे, कालिदास माकडे, विश्वजित उके आणि रवी खोटले यांनी केले.
ग्रामसभेसारख्या लोकशाही प्रक्रियेदरम्यान कर्तव्य बजावत असलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यासोबत घडलेली घटना अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावत असताना त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
कै. पी. एन. पाटील यांना न्याय मिळावा, संबंधित प्रकरणात कठोर कारवाई व्हावी तसेच ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मूक मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.
राज्यभरातील ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांनी एकजुटीने या घटनेचा निषेध नोंदवत कै. पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. भंडारा येथील मूक मोर्यातही सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध व शांततामय पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘कै. पी. एन. पाटील यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची हमी शासनाने घेतली पाहिजे,’ अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.








