‘नाकासोंगरी ते डोंगरी बु. कवलेवाडा’ रस्त्यासाठी ‘चक्का जाम’ आंदोलनाचा इशारा
दै. लोकजन वृत्तसेवा
तुमसर :- तालुक्यातील नाकासोंगरी ते डोंगरी बु. तसेच नाकासोंगरी कवलेवाडा – महालगाव या अत्यंत महत्त्वाच्या जिल्हा मार्गाची गेल्या २ ते ३ वर्षांपासून झालेली दुवस्था आणि प्रशासनाचे चालढकल धोरण याविरोधात आता नागरिक आक्रमक झाले आहेत. या रस्त्याचे तातडीने नवीन बांधकाम आणि लोभी ते डोंगरी बु. दरम्यानच्या पुलाचे काम मंजूर न झाल्यास रस्त्यावर उतरून ‘चक्का जाम आंदोलन’ करण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन देऊन त्यांचे याकडे लक्ष वेढण्यात आले आहे.
गत दोन ते तीन वर्षांत या रस्त्यावर मोठे खडे पडून रस्ता पूर्णपणे उखडला आहे. लोभी ते डोंगरी बु. या दोन्ही गावांच्या मध्यभागी असलेल्या पुलावरून पावसाळ्यात पाणी साचून वाहत असल्याने दोन्ही बाजूंचा संपर्क तुटतो. परिणामी, ‘मॉइल’ मध्ये कामाला जाणारे लोभी येथील स्थानिक कामगार आणि मजुरीवर जगणाऱ्या सामान्य जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो. शालेय विद्यार्थी, शेतकरी, गंभीर रुग्ण आणि रुग्णवाहिकारांना वेळेवर पोहोचणे कठीण झाले असून शेतमालाची वाहतूकही पार कोलमडली आहे.
‘पंचवर्कचे नौटंकी बंद करा!’
सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ थातुरमातुर खड्डे बुजवून (पंचवर्क करून) वेळ मारून नेली जात आहे. मात्र, ही मलमपट्टी पुरेशी नसून संपूर्ण नवीन रस्ता उभारणे अत्यंत गरजेचे आहे. यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांना अनेकदा निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असा आरोप आहे.
‘केवळ आश्वासन नको, प्रत्यक्ष काम करा!’
‘बारंबार तक्रारी करूनही प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. मंत्री महोदयांनी या रस्त्याची आणि पुलाची तातडीने पाहणी करून नवीन कामाला प्रशासकीय मंजुरी द्यावी. अन्यथा, नागरिकांना सोबत घेऊन तीव्र ‘चक्का जाम’ आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते ठाकचंद मुंगुसमारे यांनी दिला आहे.








