आ. भोंडेकरांचे आरोप पूर्णपणे निराधार, तथ्यहीन व राजकीय द्वेषातून

भाजप पदाधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेत आरोप

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- विकास कामांच्या निधी वाटपावर आणि भाजपच्या लोकप्रतिनिधींवर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार, तथ्यहीन व राजकीय द्वेषातून केलेले असून युती धर्मानं न शोभणारे आहेत, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष मधुरा मदनकर, उपाध्यक्ष चंद्रकला भोपे, शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर, सभापती सचिन घनमारे, नगरसेवक भगवान बावनकर, नियोजन समिती सदस्य जॅकी रावानी, जि. प. गटनेते विनोद बांते व इतर नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा मधुरा मदनकर म्हणाल्या, मी जेव्हा नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला तेव्हा नगर परिषदेत एकही फंड उपलब्ध नव्हता. वारंवार आमच्या कामाला स्थगिसी दिली जाते, नोटीस पाठवली जाते, काम थांबविले जाते. ही भूमिका आ. भोंडेकर यांनी सोडावी. गेल्या २० वर्षांपासून आम्ही राजकारणात आहोत, आजपर्यंत कोणीही पैशाचा आरोप केला नाही. मात्र गेल्या सहा महिन्यात माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला जात आहे. माझ्यावर आणि माझ्या पतीवर पैशाची मागणी केल्याचा आरोप केला जात असेल तर तो त्यांनी सिद्ध करून दाखवावा, अन्यथा मी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

भगवान बावनकर म्हणाले, भंडारा शहराच्या रस्त्यासाठी आणि विविध विकास कामांसाठी निधी आला होता. निवडणुकीमुळे टेंडर ओपन करता आले नाही. आचारसंहिता संपल्यानंतर टेंडर ओपन होणे अपेक्षित होते. मात्र आ. भोंडेकर यांच्या पत्नीचा पराभव होताच हा निधी दुसरीकडे वळविण्यात आला. नगर विकास विभागाचा निधी हा फक्त नगर विकास विभागातच खर्च करता येतो, दुसरीकडे वळवता येत नाही. तरीही वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत १४ कोटी रुपये आणि इतर ३ कोटी असे एकूण १७ कोटींचे टेंडर रद्द करून तो निधी बेकायदेशीरपणे क्रीडा विभागाच्या नावाखाली पाहुणे येथील क्रीडा संकुलासाठी वळविण्यात आला. तालुका स्तरावर ५ कोटींच्या वर टेंडरचा अधिकार नसतानाही १४ आणि २६ कोटींचे टेंडर काढण्यात आली आहेत. याबाबत आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, नगर विकास मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असून न्यायालयातही जाणार आहोत.

विनोद बांते यांनी आ. भोंडेकर हे आमचे नेते आ. परिणय फुके यांच्याबाबतीत गलिच्छ शब्दांचा उपयोग करीत आहेत, तो आम्ही खपवून घेणार नाही, असे म्हटले.

विकास निधीवरून सत्ताधारी भाजप आणि मित्र पक्षातली वाद चव्हाट्यावर आला असून या पत्रकार परिषदेमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

खासगी संस्थेत शासकीय निधीचा वापर?- जॅकी रावानी यांचा आरोप
शेतपर्यंत जाणारे पांदन रस्ते शासकीय नकाशावर असले तरी एखाद्याने ती जागा खरेदी करून कंपाउंड केल्यास ती खासगी होते. अशा ठिकाणी शासकीय निधी खर्च करता येत नाही. असे असतानाही भोंडेकर यांच्या शिक्षण संस्थेच्या जागेवर दोन वेळा एकाच कामासाठी निधी काढण्यात आला. एक २ कोटी २६ लाख क्रीडा विभागातून आणि दुसरा १ कोटी ८५ लाख आमदार निधीतून. ही जागा कोणाची आहे? या संस्थेचे अध्यक्ष, सचिव, डायरेक्टर कोण आहेत ? तिथे आमदार स्वतः, त्यांच्या पत्नी, आई, बहीण आणि जावई आहेत. काम करणारी कंपनी आर्या कन्स्ट्रक्शन आणि तिचे मालक कोण ? हे पदाचा दुरुपयोग नाही का? तसेच नागपूर नाका ते राजीव गांधी चौक रस्त्याच्या कामावर फिरत असलेली व आमदारांचे स्टीकर असलेली एमएच ३६ एक्यू २१२१ गाडी ही श्रेयस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मालकीची आहे. ज्या कंपनीने पावणे तीन कोटींची गाडी घेतली तिचे वार्षिक उत्पन्न ९ लाख, २४ लाख दाखविले आहे. १० लाख कमावणारा माणूस ३ कोटी की गाडी कशी चालवू शकतो? त्या कंपनीचे गॅरंटर कोण? याची चौकशी अशी मागणी जॅकी रावानी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *