सिरपूर ग्रामपंचायतीत १२ लाखांच्या कथित लाचप्रकरणाने खळबळ; उपसरपंचांचा आठ सदस्य व रोजगार सहाय्यावर गंभीर आरोप
चौकशीचे आदेश, ग्रामपंचायतीतील राजकारण तापले
दैनिक लोकजन वृत्तसेवा
गोंदिया :- तालुक्यातील सिरपूर ग्रामपंचायतीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) सुरू असलेल्या विकासकामांभोवती कथित १२ लाख रुपयांच्या लाचेच्या मागणीचा आरोप झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीचे उपसरपंच पंकजकुमार संघरत्न मडावी यांनी आठ ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामरोजगार सहाय्यक यांच्यावर संगनमत, पदाचा गैरवापर, ब्लॅकमेलिंग, मास्टर रोल जाणीवपूर्वक रोखून धरणे तसेच विकासकामात अडथळा निर्माण केल्याचे गंभीर आरोप करत गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, सिरपूर येथे सुरू असलेल्या मातोश्री शेत पांदन रस्ता खडीकरण या विकासकामासाठी संबंधित ठेकेदाराकडे १२ लाख रुपयांची कथित लाचेची मागणी करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी मंगळवार ३० जून २०२६ रोजी गोंदिया येथील शासकीय विश्राम गृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. ही मागणी मान्य न झाल्याने कामाचे मास्टर रोल व हजेरीपत्रके जाणीवपूर्वक रोखून धरून मजुरांच्या देयकांमध्ये विलंब करण्यात आल्याचा आरोप उपसरपंचांनी केला आहे. तसेच लेबर पेमेंटवर ५० टक्के कमिशनची मागणी करण्यात आल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
उपसरपंचांनी यापूर्वीही ग्रामरोजगार सहाय्यकाविरुद्ध घरकुल योजनेंतर्गत मजुरीच्या देयकामध्ये कथित हेराफेरी झाल्याची तक्रार केली होती. २० जानेवारी २०२६ रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत यासंदर्भात ठराव क्रमांक ५ मंजूर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, अनेक महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
दरम्यान, ३ जून रोजी करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत पंचायत समिती गोंदियाचे गटविकास अधिकाऱ्यांनी १५ जून रोजी विस्तार अधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी (मनरेगा) आणि तांत्रिक सहायक यांची त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्त करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आदेशानंतरही अपेक्षित कालावधीत चौकशी पूर्ण न झाल्याचा आरोप उपसरपंचांनी पत्रकार परिषदेत केला. तक्रारीत संबंधित सदस्यांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम ३९ अंतर्गत अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ग्रामरोजगार सहाय्यकाला सेवेतून कमी करणे, सुरू असलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या प्रक्रियेला स्थगिती देणे आणि स्वतःसह संबंधित ठेकेदाराला संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे सिरपूर ग्रामपंचायतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या धुरळ्यात विकासकामांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तथापि, उपसरपंचांनी केलेले सर्व आरोप हे तक्रारीतील दावे असून त्यांची अधिकृत चौकशी सुरू आहे. चौकशी अहवालानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याने प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. पत्र परिषदेत उपसरपंच पंकज मडावी, नंदू येरने, राजू जतपेले, गजेंद्र ठाकूर आदि उपस्थित होते.








