स्पर्धा परीक्षा घोटाळ्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आक्रमक
सभेत निर्णय: २ जुलैला भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
दैनिक लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- नीट, एमपीएससी आणि आता टीईटी परीक्षेचे पेपर फुटण्याच्या लागोपाठच्या घटनांमुळे राज्यातील तरुणांचे भविष्य अंधारात सापडले आहे. ‘दरवर्षी विद्यार्थ्यांनी फक्त रस्त्यावर उतरून आंदोलनच करायचे का’ असा संतप्त सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज दि. ३० जून रोजी सकाळी विश्राम गृह भंडारा येथे महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
बैठकीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातून स्पर्धा परीक्षा व टीईटीची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी बैठकीला उपस्थित होते.
गेल्या दशकात महाराष्ट्रात वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे राज्याची बदनामी होत असून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर होत असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. जिल्हा कार्यकारिणी, युवक व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नितेश मारवाडे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश हटवार यांनी बैठकीचे नियोजन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी व दोषींवर कडक कारवाईच्या मागणीसाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. २ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील विद्यार्थी व पक्षाचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे एकत्र जमून शासनाला निवेदन सादर करणार आहेत.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कासाठी व न्यायासाठी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पक्ष संघटनेने केले आहे.








