भंडाऱ्यात धान भरडाईचा महाघोटाळा?

४० मिलर्सकडून कागदोपत्री मिलींग

मिलर्सकडून शासनाला रुपयांचा चुना

‘मिलींग जास्त, विद्युत बिल कमी’

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- जिल्ह्यात शासकीय धान खरेदी योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. ४० राईस मिलर्सनी प्रत्यक्षात धान भरडाई न करताच केवळ कागदोपत्री मिलींग दाखवून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे महावितरणच्या वीज मीटर रीडिंगमधून हा ‘गौडबंगाल’ उघडकीस आला आहे.

शासनाच्या धान खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान भरडाईसाठी राईस मिलर्सना दिले जाते. भरडाईनंतर ठराविक प्रमाणात तांदूळ शासनाला परत करणे बंधनकारक आहे. मात्र भंडारा जिल्ह्यातील ४० राईस मिलर्सनी हजारो क्विंटल धानाची भरडाई केल्याची नोंद कागदावर केली, परंतु प्रत्यक्षात मिलींग झालेच नाही, असा आरोप आहे.

वीज बिलाने फोडले बिंग
धान भरडाईसाठी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो. मात्र संबंधित ४० राईस मिलर्सचे गेल्या काही महिन्यांचे वीज बिल अत्यंत कमी आले आहे. महावितरणच्या मीटर रीडिंगनुसार, जेवढे धान भरडाईसाठी दाखवले आहे, तेवढी भरडाई करण्यासाठी लागणाऱ्या विजेच्या तुलनेत वापर नगण्य आहे. ‘वीज बिल कमी, घोटाळा जास्त’ असा प्रकार समोर आल्याने कागदोपत्री मिलींग करून शासनाला चुना लावल्याचा संशय बळावला आहे.

या प्रकरणी जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले. ‘आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वीज वापर व मिलींगच्या नोंदी तपासल्या जात आहेत. दोषी आढळणाऱ्या मिलर्सवर कठोर कारवाई केली जाईल,’ असे पाटील म्हणाले.

शेतकरी व विरोधक आक्रमक धान घोटाळ्याची बातमी समोर येताच जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर शासनाची फसवणूक करणाऱ्या मिलर्स व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या घोटाळ्यामुळे शासनाच्या तिजोरीला लाखो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. भरडाई न झाल्याने खुल्या बाजारात धानाची विक्री करून काळाबाजार झाला आहे का, याचाही तपास होणार आहे. प्रशासनाने सर्व मिल्सची प्रत्यक्ष तपासणी सुरू केली असून अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *