आज जिल्ह्यातील विविध शिवतिर्थ भाविकांनी फुलणार

जिल्ह्यात परीसरानुसार विविध २५ च्या वर ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरत असते. भंडारा शहरातील खांबतलाव, जवळच्या गिरोला येथे यात्रा भरते. तुमसर तालुक्यातही शिव मंदिर असलेल्या ठिकाणी यात्रा भरते. सध्या शहरांसह ग्रामीण भागातील शिवभक्तांचे पोहे विविध साधनांनी मार्गस्थ झाले आहे. २६ फेब्रुवारीलामहाशिवरात्रीला गंतस्थळी पोहचण्याची धडपड भाविकांत आहे. मात्र, ज्यांचेकडे साधन नाहीत, ते एक दिवसाची यात्रा करण्यासाठी एसटीला पसंती देत असतात. त्यामुळे एसटी महामंडळाने यंदा महाशिवरात्रीनिमित्त गायमुख, प्रतापगड, आंभोरा व लाखापाटील येथे जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष बस गाड्यांचे नियोजन केले आहे.
गायमुखसाठी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजतापासून एकूण२१ बसेस सोडण्याचे नियोजन तुमसर आगाराने केले आहे. यात बसेसच्या १५० फेऱ्या होणार आहेत. अशीच व्यवस्था आंभोरा व प्रतागडसाठी करण्यात आली आहे. यातून एसटी आगाराला लाखो रुपयांचे उत्पन्न होणार आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी काही समित्यांची नेमणुक केली असून त्यामार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. तर शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक नुरूल हसन यांनी अधिनस्थ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना खास निर्देश दिले आहे.