तीर्थक्षेत्र गायमुख यात्रेत उसळणार भाविकांची गर्दी
एका ॠषीने येथे भोले शंकराची तपस्या केली होती, अशी आख्यायिका आहे. १५० वर्षापासून नागपूरचे राजे रघुजी भोसले यांचे भंडारा येथील सुभेदार स्व. यादवराव पांडे यांच्या कारकिर्दी पासून दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. येथे महाराष्ट्र व मध्यप्रदेशातुन भाविक भक्त नवसफेडण्यासाठी येतात. महाशिवरात्रीला पांडे कुटुंबाच्या वतीनेच गायमुख देवस्थानचे संचालन व आयोजन केले जाते. येथे पंचमुखी, भोलाशंकर, हनुमान, मकरध्वज, अंबाबाई व गोरखनाथाचे मंदिर आहे. भोलाशंकर मंदिर हे भारतातील प्रमुख १८ मंदिरापैकी एक आहे. भाविक हर बोला हर हर महादेवचा गजर करीत पायदळ येतात.
हजारो भाविकांची रीघ व बैलगाडी व इतर वाहनांचा ताफा मोठ्या संख्येने पहावयास मिळतो. घागरीने पाणी भरणाऱ्या महिला, धुनी लावून बसणारे साधू आणि परिसरातील नाले व पक्ष्यांच्या किलबिलाटाने परिसरातील वातावरण आल्हाद दायक असते. यात्रेकरूंसाठी भंडारा, रामटेक व तुमसरहून एस.टी. ची विशेष सुविधा असते. पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त असते. यात्रेकरूसाठी आरोग्य विभागाची विशेष व्यवस्था असते. जिल्हा प्रशासन, आरोग्य व वनविभागाचाही चौख बंदोबस्त असतो. यात विविध संस्था, व्यापारी प्रतिष्ठान व अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या वतीनेमहाप्रसादाचा आयोजन सुद्धा करण्यात येते.
पहाडीच्या झऱ्याचे पाणी गायीच्या मुखातून सतत वाहत असल्यामुळेच या स्थळाला गायमुख असे नाव पडले. येथे पाण्याचे मोठ मोठे हौद आहेत. नेहमीच स्वच्छ पाणी भरून असते. मंदिराच्या मागे डोंगरावर चौऱ्याचा गड आहे. तिथे सुद्धा देवी, देवतांची मूर्ती आहे. भाविक या गडावर सुद्धा पूजा करतात. पर्वतरांगाचे डाव्या बाजूला वनश्रीच्या कुशीत पांगळी तलावाचे निसर्गरम्य दर्शन घडते. एक कि. मी. अंतरावर पार्वतीचे हिवर आहे. जवळच असलेला ऐतिहासिक आंबागड किल्ला व पर्यटन स्थळ हे ऐतिहासिक साक्ष देत आहे.