मुंबईत संजय निरुपम अन् मनसैनिकांत राडा; आधी कारची हवा सोडली, पुन्हा बाटलीही फेकली
मुंबई:- शहरातील रिक्षावाल्यांना मराठीची सक्ती करण्याचा निर्णय राज्याच्या परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. सरनाईक यांच्या या निर्णयाचं शिवसेना, मनसे पक्षाकडून स्वागत होत असून शिवसेना नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी या सक्तीला आपला विरोध केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज संजय निरुपम हे दहिसरमधील रिक्षा चालकांसोबत संवाद साधण्यासाठी आले होते. त्याचवेळी, मनसैनिकांनी दहीसरमध्ये धाव घेत संजय खासदार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
विशेष म्हणजे, मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीची घोषणा देत संजय निरुपम यांच्या कारची हवा सोडली, त्यांच्या गाडीवर बाटली फेकून मारल्याने चांगलाच गोंधळ उडाल्याचं दिसून आलं. संजय निरुपम यांनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावरुन विरोध करत रिक्षाचालकांसोबत संवाद साधल्याचे कळताच मनसेने सुद्धा मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह दहीसर येथील रिक्षा स्टॉप गाठत संजय निरुपम यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली.
एकीकडून शिंदे शिवसेना पदाधिकारी तर दुसरीकडून मनसे पदाधिकारी असा साधारणपणे अर्धा ते पाऊण तास गोंधळ पाहायला मिळाला. जोपर्यंत संजय निरुपम जात नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही करत राहणार असा पवित्रा मनसैनिकांनी घेतला होता. सगळ्यांसोबत संवाद साधून संजय निरुपम त्या ठिकाणाहून निघत असताना मनसैनिक आक्रमक झाले, त्यांनी निरुपम यांच्या गाडीवर बाटल्या, दगड फेकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरपोलिसांनी गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि वातावरण शांत केलं. मात्र, या घटनेनं शिवसेना आणि मनसैनिकांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.









