जिल्हा परिषद भंडारा शिक्षण विभागातर्फे समीर कुर्तकोटी यांना भावपूर्ण निरोप

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा परिषद, भंडारा येथून नुकतेच बदली झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांचा निरोप समारंभ ॠणनिर्देश सोहळा शिक्षण विभाग, जिल्हा परिषद भंडारा यांच्या वतीने ऑफिसर्स क्लब, भंडारा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्य कार्यकारी अधिकारी माणिक चव्हाण होते. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या रत्नप्रभा भालेराव, माध्यमिक शिक्षणाधिकारी रविंद्र सलामे, प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के तसेच उपशिक्षणाधिकारी मंगला गोतारने, अधिक्षक मनिषा गजभिये, लेखाधिकारी अभय निनावे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवींद्र सोनटक्के यांनी व्यक्त केले.

शंकर राठोड (गटशिक्षणाधिकारी, भंडारा), मनीष वहाने, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सुशील कान्हेकर, कार्यकारी अभियंता, समग्र शिक्षा, देवानंद घरत (शिक्षक प्रतिनिधी), रेखा भवसागर (महिला प्रतिनिधी) यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना समीर कुर्तकोटी यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा केली. प्राचार्या रत्नप्रभा भालेराव, उपशिक्षणाधिकारी मंगला गोतारने, तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी रविंद्र सलामे यांनीही आपल्या मनोगतातून कुर्तकोटी यांच्या कार्यशैलीबद्दल गौरवोद्गार काढले. अध्यक्षीय भाषणात माणिक चव्हाण यांनी समीर कुर्तकोटी यांचे शिक्षण क्षेत्रासाठी योगदान व पालकत्वाची भूमिका अधोरेखित केली. या प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी हेमराज चेटुले यांचा शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सत्कारमूर्ती समीर कुर्तकोटी यांनी जिल्हा परिषद, भंडारा अंतर्गत दोन वर्षांच्या कार्यकाळातील अनुभव कथन करत सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या कार्यकाळात शिक्षण विभागात झालेल्या सकारात्मक बदलांचा, वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचा मागोवा घेतला. या कार्यक्रमाला सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, समग्र शिक्षाचे कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती नागलवाडे यांनी केले. गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांनी सर्व उपस्थितांचे मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *