बेला ग्रामपंचायतचा “माझी वसुंधरा अभियान’ राज्यस्तरावरील द्वितीय पुरस्कार देऊन सन्मान
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम डोम वरळी, मुंबई येथे आयोजित सोहळ्यात ग्रामपंचायत बेला चा महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “माझी वसुंधरा अभियान ४.०’ मध्ये ५ ते १० हजार लोकसंख्या असलेल्या मोठ्य गटात राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
महामहीम राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार, विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पर्यावरण विभागाचे सचिव जयश्री भोज यांचे हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. मुंबई येथे आयोजित माझी वसुंधरा ४.० पुरस्कार स्वीकारण्याकरिता ग्रामपंचायत बेला येथील मनिषा मनोज इंगळे, अर्चना प्रशांत पंचबुधे, बबिता योगीराज चवरे, राजनी अनिल बाभरे, सुप्रिया शत्रुघ्न शेंडे, धनराज तिमाजी गाढवे, विनोद राधाकिसन नागपुरे, स्नेहल भैय्यासाहेब मेश्राम, राकेश पांडुरंग मते, श्रीकृष्ण तुकाराम वैद्य, शारदा मारोती शेंडे, अर्चना प्रकाश कांबळे व ग्राम विस्तार अधिकारी विलास पतरूजी खोब्रागडे उपस्थित होते.









