अवैधरित्या मुरूम उत्खनन करणारा तो माफिया कोण? अभय कुणाचे?

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- अवैध रित्या मुरमाचा उत्खनन करणारा तो राजकीय माफिया कोण? त्याला अभय कोणाचे, पोलीस प्रशासनाचे की महसूल विभागाचे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महसूल विभागाच्या धाड सत्रानंतरही मुरूम उत्खनन धडाक्यात सुरू असल्यामुळे चर्चेला चांगलेच उत आले आहे. ३ कोटीच्या रस्त्यावर बिना रॉयल्टीचा मुरूम अशा बातम्याा झळकताच महसूल विभाग जागा झाला होता व ३१ जानेवारी रोजी २.३० च्या सुमारस बिना क्रमांकाचा ट्रॅक्टर (ट्रॉलीवर मंगल नाव असलेला) महसूल विभागाच्या पथकाने सिहोरा पोलिसांच्या ताब्यात दिला होता. चालकाने दिलेल्या माहितीनुसार तो ट्रॅक्टर मंगल बिसने यांचा होता व आजही तो पोलिसांच्या ताब्यात आहे. सदर ट्रक हा पोलिसांच्याताब्यात आहे तेव्हा मुरमाचा उपसा करणारे ते ट्रॅक्टर कोणाच्या मालकीचे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सिहोरा व परिसरात ट्रॅक्टरची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व ते अवैध रित्या मुरूम उपसा करीत आहेत. तेव्हा या ट्रॅक्टर मालकावर महसूल विभाग कार्यवाही का करीत नाही हा चर्चेचा विषय आहे. सोनेगाव, धनेगाव व सिहोराच्या मध्यभागी चांदपूर जलाशया लगत असलेल्या गट क्र. २१० या शेत जमिनी मध्ये मुरमाची खदान आहे.

त्या खदानीतुन अवैधरित्या मुरमाचे उत्खनन होत आहे. अवैध उपसा करणाऱ्यावर महसूल विभागाचे अधिकारी कारवाई कां करित नाही हे न समजण्यासारखे आहे. ते राजकीय पक्षाचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही कां असाही प्रश्न उपस्थित होत आहे. अवैधरित्या मुरूम उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होतआहे. बिना रॉयल्टीचा मुरूम प्रकरणाने आता उलटी कलाटणी मारली आहे. धनेगावच्या सिमेत असलेल्या गट क्र. २१० या जमिनीतून मुरुमाचा अवैध उत्खनन सुरू आहे. जमीनीच्या ७/१२ वर मालकी कोणाची शासनाची, वन विभागाची, की अतिक्रमण करणाऱ्यांची याची महसूल विभागाने चौकशी करावी व अतिक्रमण करून असेल तर ती सरकार जमा करुण रीतसर रॉयल्टी देण्यात यावी अशी मागणी होत आहे. बिना रॉयल्टी अवैध उत्खनन हे प्रकरण दिवसें दिवस तापत चालले आहे. याकडे महसूल विभागाचे सुद्धा लक्ष वेधण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *