शिक्षणाधिकारी म्हणतात,”शिक्षकांना इतक्या सुट्ट्या हव्या कशाला’

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यानंतर शाळा तीन दिवस अगोदर सुरू झाल्या. नियोजनानुसार तीन सुट्ट्या शिल्लक आहेत. मात्र,”शिक्षकांना खूप सुट्ट्या मिळतात. शिक्षकांना इतक्या सुट्ट्या हव्यात कशाला’ असे वक्तव्य शिक्षणाधिकाऱ्यांनी (माध्यमिक) शिक्षक संघटनेच्या बैठकीत केले. या व्यक्तव्यामुळे शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करून तेथील दालन सोडले. शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ च्या सत्रात सर्व शाळा २३ जून रोजी सुरू झाल्या.

शिक्षणाधिकारी व शिक्षक संघटनांच्या नियोजनाप्रमाणे जिल्ह्यातील शाळा २६ जून रोजी सुरू होणार होत्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर तीन दिवस अगोदर शाळा सुरू झाल्या. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधील तीन सुट्ट्या शिल्लक राहिल्या आहेत. शिल्लक राहिलेल्या सुट्ट्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये समायोजित करण्यात याव्या याबाबत जिल्ह्यातीलशिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी २९ सप्टेंबर रोजी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मंगला गोतारने यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेतली. उन्हाळ्याच्या शिल्लक सुट्ट्यांची बाब लक्षात आणून दिली. तसेच यापूर्वी शिल्लक सुट्ट्यांबाबतीत माध्यमिक शिक्षण विभागाला पत्र सुद्धा देण्यात आले होते.

सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून शिल्लक सुट्ट्यांचे नियोजन करण्यात यावे असे सुद्धा पत्रातून सांगण्यात आले. मात्र दीड – दोन महिन्यांपासून शिक्षणाधिकारी मंगला गोतारणे यांनी कोणत्याही शिक्षक संघटनांचे ऐकले नाही. त्यामुळे, शिक्षक संघटनांच्यापदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी मंगला गोतारने यांची भेट घेतली होती. यावेळी सर्व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षरीनीशी निवेदन सुद्धा दिले होते. यावेळी सभेला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, अध्यक्ष सुधाकर देशमुख, मुख्याध्यापक असोसिएशनचे सचिव राजू बांते, कोषाध्यक्ष राधेश्याम धोटे, शिक्षक भारती संघटनेचे मुख्य कार्यवाह विनोद किंदर्ले, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष प्रवीण गजभिये, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष अंगेश बेहलपाडे, माध्यमिक विभाग शिक्षक भारतीचे अध्यक्ष डी.एच. कांबळे, भंडारा जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे कार्यवाह गंगाधर भदाडे, भंडारा जिल्हा परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर करणारे संघटनेचे बाळासाहेब मुंडे उपस्थित होते.

मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांनी, “शिक्षकांना खूप सुट्ट्या मिळतात. एवढ्या सुट्ट्या हव्यात कशाला. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीत शाळांना तीन सुट्ट्या दिल्या. त्यामुळे सुट्ट्यांची गरज काय’ असा सवाल शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना केला. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तीन शिल्लक सुट्ट्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली. बाहेरील जिल्ह्यातील सुट्ट्यांचे परिपत्रकही देण्यात आले. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी सावध पवित्रा घेऊन, शिक्षण उपसंचालकांना या सुट्ट्यांबद्दल विचारते, दुसऱ्या दिवशी पत्र काढते’ असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सभेत सांगितले. बैठक होऊन एक आठवडा उलटला आहे. मात्र, शिल्लक राहिलेल्या सुट्ट्या बद्दलचे पत्र काढले नाही. या प्रकारामुळे शिक्षक संघटनांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *