पूरग्रस्तांच्या मदतीला बाप्पा, लालबागचा राजा मंडळाकडून मोठा चेक; राज्यातील शिक्षकही १ दिवसाचा पगार देणार
मुंबई:- राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं अनोतान नुकसान झालं आहे. शेतातील पिकांसह माती आणि जनावरंही वाहून गेली आहेत. त्यामुळे, बळीराजावरील या संकटात आता माणूसकीचा आधार देण्यासाठी हात पुढे सरसावले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ २२१५ कोटींची मदत पूरग्रस्तांसाठी जाहीर केली असून पुढील काही दिवसांत ही मदत शेतकऱ्यांपुढे पोहोचेल असेही त्यांनी म्हटले. दुसरीकडे आता मुख्यमंत्री सहायता निधीमधूनही शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. राज्यातील सर्वपक्षीय विद्यमान आमदार, खासदार यांनी आपले १ महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी देऊ केले असून सरकारी कर्मचारीही एक दिवसाचा पगार देणार आहेत. आता, लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळानेही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदतीचा हात दिला आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात देण्यात आला आहे. लालबागचा राजा मंडळाकडून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल ५० लाख रुपये मदत करण्यात आली असून मंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ५० लाखाचा धनादेश सुपूर्द केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन मुख्यमंत्र्यांकडे हा धनादेश सुपूर्द जाणार केला आहे. तर, राज्यातील सर्व शिक्षक आपला एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत. राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आणि पूर परिस्थितीमुळे शेतकरी पूर्णतः कोलमडला आहे. शेतातील पिकांचे नुकसान झालेला आहे, त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यातील सर्व शिक्षकांच्यावतीने एका दिवसाचे वेतन या पूरग्रस्तशेतकऱ्यांसाठी दिलं जाणार आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.







