वेश्याव्यवसाय रॅकेट चालवणाऱ्या तुमसरातील दोघांना अटक
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- येथील दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने आज तुमसर शहरात सुरू असलेल्या एका मोठ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमसर येथील आंबेडर वार्डमधील वैभव अनिरुद्ध बोरकर, वय ४० आणि शिवाजी वार्डमधील भारत सुखदेव कोल्हाडकर, वय ३६ असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव बोरकर व भारत कोल्हाडकर हे दोघे मिळून मेहेगाव येथे बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये वेश्याव्यवसायाचा अड्डा चालवत होते. हे दोघे आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना या व्यवसायात ढकलत होते. माहितीची खात्री पटल्यानंतर तुमसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव यांच्या आदेशानुसार ही कारवाईची योजना आखण्यात आली.
या कारवाईसाठी गोबरवाही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. पथकाने बनावट ग्राहक पाठवून या माहितीची पडताळणी केली. बनावट ग्राहकाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव बोरकर आणि भारत कोल्हाडकर हे दोघे महिला पुरवत होते आणि ग्राहकांकडून पैसे घेत होते. पुराव्यांची खात्री झाल्यानंतर, पोलीस पथकाने पंचांसमक्ष त्या घरात छापा टाकला. छाप्यात पोलिसांनी वेश्याव्यवसायासाठी वापरले जाणारे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली.
तसेच, या अड्ड्यामध्ये सापडलेल्या एका महिलेची सुटका करण्यात आली. त्या महिलेने दिलेल्यामाहितीनुसार, ती भारत कोल्हाडकर याच्या सांगण्यावरून येथे येत होती आणि ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांतील काही भाग त्याला देत होती. या कारवाईनंतर आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर कलम ३, ४, ५, अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन सा.,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर, मयंक माधव सा., दहशतवाद विरोधी शाखा भंडारा येथील स.पो.नि. गणेश बैरागी, स.फौ. धनंजय कुरंजेकर, पो.हवा. प्रमोद वैद्य, विजय तायडे, म. पो.हवा. शिला चामलाटे, पो.शि. योगेश सरवरे आणि चा.पो.शि. आशिष जांभुळकर यांनी पार पाडली.







