आरोग्य संवाद यात्रा चित्ररथाचे भंडारा जिल्ह्यात आगमनजिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्यात आरोग्य संवाद यात्रा चित्ररथाचे आगमन झाले आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावागावात जाऊन सार्वजनिक आरोग्य विभाग व त्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे.

या चित्ररथाला जिल्हा परिषद भंडारा येथून हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद भंडारा च्या अध्यक्षा कविता उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, आरोग्य व अर्थ सभापती आनंद मलेवार, शिक्षण व बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर, समाज कल्याण सभापती शितल राऊत, महिला व बालकल्याण सभापती अनिता नलगोपुलवार तसेच जिल्हा परिषद सदस्य व आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आरोग्य संवाद यात्रा चित्ररथाच्या माध्यमातून माता व बाल संगोपन, कुटुंब कल्याण, लसीकरण, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, हिवताप, हत्तीरोग नियंत्रण, तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आदी विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. ग्रामीण भागात आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करून शासनाच्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, हा या यात्रेमागचा मुख्य उद्देश आहे.

हा चित्ररथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये फिरणार असून ऑडिओ-व्हिडिओ माध्यमातून नागरिकांना आरोग्य संदेश देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *