जिल्ह्यातील ५०० ओबीसी बांधव दिल्लीतील महाआंदोलनासाठी रवाना
ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी एल्गार ⇨ आ. राजू कारेमोरे यांनी दिल्या शुभेच्छा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेच्या मागणीसाठी दिल्ली येथील रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक महाआंदोलनासाठी भंडारा जिल्ह्यातील ५०० ओबीसी बांधव आज रवाना झाले. तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनी भंडारा येथे २०० दिवसांपासून सुरू असलेल्या ओबीसी संघर्ष समितीच्या आंदोलन मंडपात भेट देऊन महाआंदोलनासाठी जात असलेल्यांना शुभेच्छा दिल्या.
देशभरात ओबीसी समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी भंडारा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते दिल्लीला जात आहेत.
यावेळी बोलताना आमदार राजू कारेमोरे म्हणाले, ‘ओबीसी समाज हा देशाच्या लोकसंख्येच्या ५२ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, मात्र आजपर्यंत त्यांची स्वतंत्र जनगणना झालेली नाही. त्यामुळे शासकीय योजना, नोकऱ्या, शिक्षण आणि राजकीय आरक्षणात ओबीसींवर अन्याय होत आहे. जोपर्यंत स्वतंत्र जनगणना होत नाही, तोपर्यंत ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय मिळणार नाही. त्यामुळे दिल्लीतील आंदोलन हे निर्णायक ठरणार आहे.
‘भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या या ५०० कार्यकर्त्यांमध्ये जिल्ह्यातील सातही तालुक्यांमधील ओबीसी समाज बांधव, युवक, महिला आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात गाव पातळीवर बैठका घेऊन या आंदोलनासाठी जनजागृती करण्यात आली होती.
यावेळी आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. ‘आम्ही आमच्या हक्कासाठी दिल्लीला जात आहोत, जोपर्यंत सरकार आमची मागणी मान्य करणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,’ अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आंदोलकांनी ‘ओबीसी एकजुटीचा विजय असो’, ‘जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे’ अशा घोषणा दिल्याने परिसर दणाणून गेला.
दिल्ली येथील रामलीला मैदानात देशभरातून लाखो ओबीसी बांधव एकत्र येणार असून हे आंदोलन केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेणारे ठरणार आहे. भंडारा जिल्ह्यातून गेलेला हा जथा या ऐतिहासिक लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.









