मोक्का अंतर्गत कारवाईच्या कचाट्यातील फरार आरोपींना भंडारा पोलिसांनी केले जेरबंदवैनगंगा पुलावरील लूट प्रकरणात मोठे यश
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वैनगंगा नदी पुलावर ट्रक अडवून चालकास लाकडी दांड्यांनी मारहाण करून १५ हजार रुपये लुटणे आणि ट्रकची तोड फोड करून ५० हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का), १९९९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या गंभीर गुन्ह्यातील अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना भंडारा पोलिसांनी विशेष नियोजन आणि गोपनीय माहितीच्या आधारे सलग दोन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करून मोठे यश मिळविले आहे.
दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ०७.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी अक्रम खान उस्मान खान पठाणे, वय ४५ वर्षे, रा. हासन, राज्य कर्नाटक हे ट्रक क्रमांक केए१८ सी ४८४५ ने रायपूर ते नागपूर मार्गाने जात असताना ग्राम कोरंभी जवळील वैनगंगा नदीच्या पुलावर आरोपी चिराग नमोद गजभिये, रा. रमाबाई आंबेडकर वॉर्ड, भंडारा, मोनार्च प्रकाश शेंडे रा. विद्यानगर आणि अस्मित उर्फ रामा रामेश्वर कुकडे, रा. वडोदा ता. मौदा आणि त्यांच्या इतर १२ साथीदारांनी संगनमत करून त्यांचा ट्रक अडवला. लाकडी दांड्यांनी ट्रकच्या काचा फोडून अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान केले. त्यानंतर फिर्यादीस जबरदस्तीने खाली उतरवून मारहाण केली व त्यांच्या खिशातील १५ हजार रुपये जबरीने हिसकावून घेतले.
याप्रकरणी पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींच्या संघटित गुन्हेगारी कारवायांच्या अनुषंगाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ चे कलम ३(१)(पप), ३(२), ३(४) अन्वये वाढ करण्यात आली असून या कायद्याच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी मोनार्च प्रकाश शेंडे (वय २५ वर्षे, रा. विद्यानगर गणेशपूर) हा फरार होता. तसेच आरोपी अस्मित उर्फ रामा रामेश्वर कुकडे याच्याविरुद्धही पुढील कायदेशीर कारवाईच्या अनुषंगाने पोलीस शोध घेत होते. दोन्ही आरोपी पोलिसांना वारंवार हुलकावणी देत होते.
दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी आरोपी अस्मित उर्फ रामा रामेश्वर कुकडे हा मौजा वडोदा, ता. मौदा, जि. नागपूर येथे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार वरिष्ठांची परवानगी घेऊन स्थानिक मौदा पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्यास ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी फरार आरोपी मोनार्च प्रकाश शेंडे हा मौजा मेंढा, पोस्ट मानेगाव (बाजार) येथील मंडई कार्यक्रमास येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी मंडई परिसरात सापळा रचून मोठ्या शिताफीने त्यास गर्दीतून ताब्यात घेतले व अटक केली.
अशा प्रकारे मोक्का अंतर्गत कारवाई सुरू असलेल्या या गंभीर गुन्ह्यातील दोनही आरोपींना सलग दोन दिवसांत अटक करण्यात भंडारा पोलिसांना यश आले आहे.
सदरची कारवाई नूरुल हसन, पोलीस अधीक्षक भंडारा, निलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक भंडारा, तेजस सारडा, सहायक पोलीस अधीक्षक भंडारा व प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन भंडाराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि बोरकर, सपोनि खंडाडे, पोउपनि रोशन ओकटे, सहा. फौजदार रोशन गजभिये, तुळशिदास मोहरकर, विजय राऊत, पोलीस अंमलदार प्रशांत कुरंजेकर, अंकुश पुराम, संदीप बंबावले, अनुज वालदे, रोहन काळे व वाडीभस्मे यांनी केली आहे.









