तालुका क्रीडा संकुल समिती तर्फे राष्ट्रीय खेळाडू जान्हवी तरोने चा सत्कार
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- ७० वी शालेय क्रीडा राष्ट्रीय अॅथलेटिक मीट २०२६ मध्ये १७ वर्षांखालील मुलींच्या गटात जान्हवी दिनेश तरोने हिने गोळा फेक स्पर्धेत ब्रॉंझ मेडल पटकावून साकोली तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे.
देशभरातून आलेल्या नामांकित खेळाडूंमध्ये जान्हवीने आपली ताकद, तंत्र आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ही ऐतिहासिक कामगिरी केली. गोळा फेक सारख्या ताकदीच्या आणि कौशल्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय पदक मिळवणे ही खरोखरच मोठी उपलब्धी आहे.
या यशाबद्दल साकोली तालुका क्रीडा संकुल समितीच्या वतीने जान्हवीचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा संघटक शाहेद कुरैशी, तालुका संयोजक तुषार मेश्राम, क्रीडा शिक्षक दुधराम मानकर, प्रवीण कथाने, ललित खराबे, मोहन रहिमतकर यांच्या हस्ते प्रशिक्षक सुशांत बांडेबुचे व राष्ट्रीय खेळाडू जान्हवी तरोने यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना शाहेद कुरैशी यांनी सांगितले की, ‘जान्हवीच्या या यशामागे तिची मेहनत, शिस्त, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षक सुशांत बांडेबुचे यांचे मार्गदर्शन आहे. तिने तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करून आता राष्ट्रीय स्तरावर ब्रॉंझ मेडल मिळवले आहे, ही साकोलीसाठी अभिमानाची बाब आहे.’
जान्हवीच्या या यशामुळे साकोली तालुक्यातील इतर विद्यार्थी-विद्यार्थिनींना खेळात पुढे जाण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व क्रीडाप्रेमींनी शुभेच्छा दिल्या.









