गोवारी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग मोकळा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी गावाबाहेर राहून शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी विभागीय, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावर शासकीय वसतीगृहे कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच धर्तीवर आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजासाठी स्वतंत्र विकास कार्यक्रम राबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे गोवारी समाजातील हजारो विद्यार्थी, महिला, बेरोजगार युवक व नागरिकांना थेट लाभ होणार असल्याचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी सांगितले. गोवारी समाजाच्या समस्या गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी मांडत असलेल्या डॉ. फुके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, या निर्णयामुळे गोवारी समाजाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या नव्या योजनेनुसार, अनुसूचित जमातींप्रमाणेच गोवारी समाजातील विद्यार्थ्यांना वसतीगृहांमध्ये प्रवेश, निवास, आहार आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य मोफत पुरवले जाईल. यासोबतच शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षिसे अशा विविध योजना देखील राबविल्या जाणार आहेत. केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर महिलांसाठी स्वयंरोजगार व उद्योजकतेला चालना देणाऱ्या योजना आणि बेरोजगार तरुणांसाठी व्यवसायासाठी अर्थसहाय्य अशा उपक्रमांचाही समावेश या कार्यक्रमात असणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.