यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा नोंदणीमध्ये राज्यात भंडारा प्रथम
मुख्य कार्यक्रमाला खासदार डॉ.प्रशांत पडोळे, जिल्हाधिकारी संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे, प्रभारी पोलीस अधिक्षक इश्वर कातकडे, वनसंरक्षक राहूल गवई उपस्थित होते. यावेळी जिल्हयाच्या प्रगतीचा आढावा पालकमंत्र्यांनी भाषणात घेतला.त्यामध्ये भंडारा जिल्हा युडायस प्लस प्रणालीमध्ये शाळा शिक्षकांची १००% नोंदणीबाबत राज्यात प्रथम स्थानी असल्याचेत्यांनी सांगितले. जिल्हयात राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या संदेशवहनासाठी प्रभावी चॅटबोट करीता प्रशासनाला व ज्योती नागलवाडे या सहशिक्षीकेला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला असून ही जिल्हयासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा या अभियानामध्ये जिल्हयाने उत्तम काम केले आहे. तालुका व जिल्हा स्तरावर यशस्वी ठरलेल्या ४८ शाळांना एक कोटी २२ लक्ष रुपये रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिके देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द प्रकल्पासाठी मंत्रिमंडळाने २५ हजार ९७२ कोटी ६९ लक्ष निधी उपलब्ध करून दिल्याने या प्रकल्पाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हयात विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी वेगाने सुरू असुन राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या ई- केवायसी जोडणीमध्ये भंडारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी पंपांचे उर्जीकरण योजनेत २०२४ -२५ मध्ये ५७६ कृषीपंप ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आले असून मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेअंतर्गत १६२० लाभार्थी पात्र झाल्याचे त्यांनी सांगितले.महावितरणतर्फे वीज गळती कमी करण्यासाठी तसेच स्मार्ट मीटरिंगसाठीच्या योजना सुरू आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सौर ऊर्जा योजनेत सहभागी होऊन लोकांनी हरित ऊर्जा निर्माण करून पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, असे ही आवाहन त्यांनी केले. या योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये एकूण २७६७ वीज ग्राहकांच्या छतावर सौर प्रकल्प उभारण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. भंडारा जिल्ह्यात पारंपारिकरित्या टसर कोश उत्पादन घेतले जात असून कोश उत्पादन ते कापड निर्मिती करणारा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. शेतक-यांनी तुती लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.