सरपंचांचे पंचायत समिती समोर धरणे आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- बांधकाम अर्जावर ग्रामसेवक सही करीत नसल्याने गावकऱ्यांनी सरपंचांवर दबाव आणणे सुरु केले आहे. याची दखल घेत आज मोहाडी तालुक्यातील सरपंचांनी पंचायत समिती मोहाडी गाठून खंडविकास अधिकारी यांच्या गेटसमोर धरणे आंदोलन केले. बांधकाम कामगारांना ९० दिवस काम केलेल्या अर्जावर ग्रामसेवक यांनी सह्या करावे असे निर्देश आहेत. परंतु, ग्रामसेवक संघटनांनी याला विरोध केला असल्याने ग्रामसेवकांनी अर्जावर सह्या करण्यास नकार दिला आहे. यामुळे बांधकाम कामगार सह्यासाठी गावातील सरपंचांवर दबाव आणत आहेत. बांधकाम कामगारांचा दबाव पाहता मोहाडी तालुक्यातील सर्व सरपंचांनी आज पंचायत समिती मोहाडी गाठली. खंड विकास अधिकारी यांच्या गेटसमोर धरणे दिले. यावेळी पंचायत समिती सभापती जगदीश शेंडे, माजी उपसभापती रितेश वासनिक, माजी उपसभापती बब्लु मलेवार व इतर पंचायत समिती सदस्यांनी खंड विकास अधिकारी यांना यावर तोडगा काढण्याची विनंती केली.

परंतु, खंड विकास अधिकारी यांनी त्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे सरपंच संतापले. जोपर्यंत ग्रामसेवक सही मारण्यास तयार होणार नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा हट्टाहास सरपंचांनी केला. पंचायत विस्तार अधिकारी बोदीले यांनी सरपंचांना ग्रामसेवक यांचे संबंधीत तक्रार करा असे म्हटल्यानंतर सरपांचांनी बोदीले यांना धारेवर धरले. बोदीले यांना आपण ग्रामपंचायतला भेट देण्यासाठी येता तेव्हा सरपंच यांना का बोलवत नाही, असा प्रश्न निर्माण केला असता बोदीले त्यावर काहीच बोलले नाही. ग्रामसभेत विषय मांडला असता ग्रामसेवक सही मारीत नाहीत. त्यांचेवर कारवाई करू असे म्हटले तर कारवाई केली नाही यावरही सरपंचांनी संताप व्यक्त केला. सरपंच संघटनेचे अध्यक्ष, सचिव व आमदार राजू कारेमोरे हे पंचायत समितीत आले. त्यांनी मार्ग मोकळा करून दिला. सोमवारला ग्रामसेवक सही मारणार असल्याचे सांगितल्याने सरपंचांनी आंदोलन मागे घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *