खासगी शाळेचा अनागोंदी कारभार,पालकांत संताप
याशिवाय, पुस्तके, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्यासाठी अवास्तव दर आकारले जात असल्याचे तक्रारी पालकांनी केले आहे. लाखनी तालुक्यातील केसलवाडा येथील एम. डी. एन. फ्यूचर स्कूल या स्वयं अर्थसहाय्यित शाळेवर पालकांनीगंभीर आरोप केला असून, यासंदर्भात (दि.३) एप्रिल रोजी भंडारा येथे एक तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत शाळेच्या मुख्याध्यापक आणि संचालक मंडळावर शुल्क विनियमन कायद्याचे उल्लंघन, आर्थिक शोषण आणि पालक-शिक्षक संघटनेच्या नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
तक्रारकर्त्यांमध्ये शमीम शफी आकबानी आणि अक्षय चंद्रशेखर खेडीकर यांचा समावेश असून, त्यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद भंडारा, धर्मादाय आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच आमदार नाना पटोले यांच्याकडे (दि.५) एप्रिल रोजी निवेदन सादर केले आहे. शाळेने महाराष्ट्र शिक्षण संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११, २०१४, २०१६ आणि २०१८ च्या तरतुदींचे उल्लंघन करून शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी पालकशिक्षक संघटनेच्या संमतीशिवाय मनमानी पद्धतीने शुल्क आकारणी केल्याचा आरोप आहे.
बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा देण्यात आली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पालकशिक्षक संघटनेच्या कार्यकारी समितीत अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती आणि इतर मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व देण्यात आले नसल्याचा आरोप आहे. तक्रारीत शाळेवर भारतीयन्याय संहिता २०२३ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.