महिला रुग्णालय कामाच्या चौकशीचे आदेश धडकले
या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, दोन वर्षांपूर्वी खोब्रागडे हे सार्वजनिक बांधकाम विभागात भंडारा उपविभागीय अभियंता म्हणून रुजू झाले. रुजू झाले तेव्हापासून उपविभागीय अभियंता खोब्रागडे हे तानाशाही पध्दतीने वागत असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत अनेक शासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. जुन्या इमारतीकडे त्यांचे दुर्लक्ष करून नवीन कामाना सुरवात केली जाते. विशेष म्हणजे यातील अनेक कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे. पत्रकारांचा माहिती मागितल्यावर उर्मट भाषेत आणि उडवाउडवीची उत्तरे देत असून पत्रकारांना असभ्य वागणूक देतात. अशाच एका प्रकरणात खोब्रागडे यांच्या विरोधात २१ जानेवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे त्यांची तक्रार करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या अनेक तक्रारी तत्कालीन पालकमंत्री गावीत, मुख्य अभियंता नागपूर व जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडे झालेल्या आहेत. मात्र त्यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्याने आजवर त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. मागील वर्षी नागपूर हिवाळी अधिवेशनात देखील उपविभागिय अधिकारी यांची तक्रार केली होती. परंतु वर्ष लोटूनही शासन स्तरावरून त्यांचेवर कुठलीच कार्यवाही झालेली नाही असा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे.
उपविभागीय अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांची तडकाफफडकी बदली करून कार्यालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी विजय क्षीरसागर यांनी केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सहाय्यक मुख्य अभियंता सुनील बावणे यांनी अधीक्षक अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, नागपूर यांना भंडारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्या कामाची चौकशी करणेबाबत पत्र पाठवले. त्यानंतर दि. ११ मार्च २०२५ रोजी दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, (सा.बां.) नागपूरच्या अधीक्षक अभियंता सुषमा बोंद्रे यांनी क्षीरसागर यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने भंडारा उपविभागिय अभियंता यांच्या चौकशीचे आदेश आणि भंडारा महिला रुग्णालयाच्या कामाबाबत अहवाल व दस्ताऐवजांच्या साक्षांकित प्रती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यात प्रशासकीय मान्यता आदेश प्रत आणि तांत्रिक मान्यता प्राप्त अंदाजपत्रकाची प्रत, करारनामाप्रत, काम पूर्ण झाले असल्यास पुर्णत्वाचे प्रमाणपत्र, हस्तांतरण पत्र अशा १२ प्रत मागविण्यात आलेल्या आहेत.