बिबट्याने गोठ्यातील पाच शेळ्यासहित एक पाटरु केले फस्त
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- येथील वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या नियतक्षेत्र लाखनी येथील सालेभाटा येथे गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने ५ शेळ्या व १ पाटरु ठार झाल्याची घटना सोमवारी (ता.१७) रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. पशुपालकाचे नाव प्यारेलाल मोडकू रहांगडाले वय (६०) रा. सालेभाटा असे असून त्याचे अंदाजे ५५ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती सालेभाटा येथील जिल्हा कांग्रेस सेवा दल अध्यक्ष कैलास (रणवीर) भगत यांनी वनविभागाला दिली असली तरी पशूपालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्यारेलाल रहांगडाले हेअल्पभूधारक शेतकरी असून शेती अल्प शेती असल्याने कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी शेळी पालनाचा व्यवसाय करतात.
रवीवारी रात्री घरच्या पाळीव प्राण्यांना चारापाणी करून गोठ्यात बांधले व कुटुंबीयांसह ती झोपी गेले. पहाटेच्या सुमारास अचानक गोठ्यात शिरून बिबटाने हल्ला केल्याने शेळ्यांनी आरडा-ओरड केली असता झोपमोड झाल्यामुळे पशूपालकानी गोठ्यात जाऊन पाहिले असता पाच शेळ्या गोठ्यात फस्त केल्या व लहान पाटरु उचलून नेल्याचे आढळून आले. घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. अशा नेहमी होणाऱ्या घटनेमुळे परिसरात पशुपालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.