पांडे महलास आदिवासी वस्तु संग्रहालयात सामावून घ्या
वास्तुशास्त्र आणि इतिहासप्रेमींसाठीही पांडे महल विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे आदिवासी संस्कृतीचे समृद्ध केंद्र आहेत, मात्र या संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी भौतिक स्वरूपात पुरेशे प्रयत्न झालेले नाहीत. पांडे महलच्या भौगोलिक स्थानाचा विचार करता या ऐतिहासिक वास्तूचे ‘आदिवासी वस्तुसंग्रहालय’ म्हणून रूपांतर करणे योग्य ठरेल. या संग्रहालयामुळे आदिवासी हस्तकला, पारंपरिक वस्त्रप्रकार, शस्त्रास्त्रे, वाद्ये आणि पूजासामग्रीचे जतन व प्रदर्शन होईल.
आदिवासी लोककथांवर आधारित विशेष दालने निर्माण करता येतील, ज्यामुळे संशोधन व अभ्यासाला चालना मिळेल. स्थानिक आदिवासी कलाकार व हस्तकला व्यावसायिकांना व्यासपीठ उपलब्ध होईल, त्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील. पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. भंडारा जिल्ह्याचे एक ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून महत्त्व वाढेल. पांडे महलमध्ये आढळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण घटकांमध्ये १८ व्या शतकातील वास्तुशैली, मध्यभागी कारंजे, बेल्जियन टाईल्स, झुंबर, मोठे आरसे, कोरीव लाकडी प्रवेशद्वार, प्राण्यांच्या मुखवटे आणि हस्तनिर्मित खेळणी यांचा समावेश आहे. निवेदनात मागणी करण्यात अली की शासन निर्णय दि. २४ नोव्हेंबर २०१६, क्रमांक स्मारक २०१६/प्र.क्र.१३९/सां.का.३ नुसार, महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्वस्थळे अधिनियम १९६० अंतर्गत पांडे महलला राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी.