तुमसर तालुक्यात ६,२४३घरकुलांचे उद्दिष्ट
हा कार्यक्रम तुमसर येथे पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केला होता. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत ६,०२७ लाभार्थ्यांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र सभापती दीपिकाताई गौपाले व उपसभापती सुभाष बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच तुमसरतालुक्यातील ९७ ग्रामपंचायती कडून सर्व ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभा घेऊन प्रधानमंत्री आवास योजना च्या टप्पा-२ लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्र ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक आणि पंचायत समिती स्तरावरून नेमलेले नोडल अधिकारी यांच्या उपस्थितीत पात्र लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
यात तुमसर तालुक्यातील घरकुलाच्या पहिल्या हप्त्यासाठी पात्र असणाऱ्या लाभार्थीच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेत सरकारकडून तुमसर पंचायत समिती मधील ९७ ग्रामपंचायती करीता ६२४३ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तसेच यापैकी पात्र लाभार्थीचे कागदपत्र घेऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे व ऑनलाईन घरकुलांना मंजुरी देणे, तसेच पहिला हप्ता वितरण करणे ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मंजुरीचे प्रमाणपत्र वाटत करण्या अगोदर सर्व लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनाच्या बांधकामाबाबत माहिती देण्यात आली. मंजूर बांधकाम त्वरित सुरू करून पूर्ण करण्यासाठी प्रथम हप्ता रुपये १५ हजार सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे येथील झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमातून ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला. त्यामध्ये तुमसर तालुक्यातील एकूण ३७०० घरकुल लाभार्थ्यांना ५ कोटी ५९ लाख रुपयाचा निधी प्रथम हप्त्याच्या रूपाने वितरीत करण्यात आला.
त्यामुळे तालुक्यातील लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्वतःच्या घराची स्वप्नपूर्ती झाल्याचे समाधान दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्नपूर्तीचे एक पाऊल पुढे असल्याची भावना लाभार्थ्यांमध्ये दिसून आली. पंचायत समितीमध्ये आयोजित कार्यक्रमात सभापती दीपिकाताई गौपाले व उपसभापती सुभाष बोरकर तसेच पंचायत समिती सदस्य सुशीलाताई पटले व गटविकास अधिकारी नंदकिशोर वाळेकर यांनी मार्गदर्शन केले व आवास योजनेचे काम लवकरात लवकर करण्याचे आवाहन केले. सदर आवास योजनेमध्ये लाभार्थी मंजूरीकरिता विशेष परिश्रम घेणारे वामन भगत,आशिष वनवे, राजू ढबाले, भूषण पडोळे यांनी व सर्व गृहनिर्माण अभियंता, सर्व रोजगार सेवक, सर्व ग्रामपंचायत अधिकारी आणि सर्व सरपंच यांनी विशेष परिश्रम घेतल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांना मंजुरी प्रदान करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे संचालन सहा गट विकास अधिकारी सुभाष सानप यांनी तर आभार प्रदर्शन कनक पाटे यांनी केले. तसेच सर्व आवास योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचा संकल्प सुद्धा कार्यक्रमाच्या वेळी करण्यात आला आहे.